Mumbai Metro Tendernama
मुंबई

मुंबई मेट्रो-३ : सीप्झ ते बीकेसीपर्यंतचा पहिला टप्पा २०२४ मध्ये

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मेट्रो-३ (Metro 3) च्या आरे येथील कारशेडवरील स्थगिती उठविल्यानंतर आता याठिकाणी कारडेपोचे काम आणि इतर अनुषांगिक कामे आता वेगाने सुरु झाली आहेत. मरोळ मरोशी मार्ग, सारीपुत नगराजवळील रॅम्पपासून मरोळ नाका मेट्रो स्थानकापर्यंतच्या ३ किमी लांबीच्या ट्रॅकवर प्रोटोटाइप ट्रेनच्या चाचण्या होणार आहेत. आरे डेपोचे काम पूर्ण करून सीप्झ ते बीकेसीपर्यंतचा पहिला टप्पा २०२४च्या पहिल्या तिमाहीत सुरु करण्याची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची अपेक्षा आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ जुलै २०२२ च्या आदेशान्वये ठाकरे सरकारने मेट्रो-३ च्या कारशेडला २९ नोव्हेंबर २०१९ दिलेले स्थगिती आदेश रद्दबातल ठरवले आहेत. त्यानंतर राज्य सरकारने आरे येथील मेट्रो कारशेडचे काम पुन्हा सुरु करण्यास मुंबई मेट्रो रेल कॉर्परेशनला निर्देश दिले आहेत. त्यानुसार डेपोमध्ये प्राथमिक कामे सुरू करण्यात आली असून त्यामध्ये मुख्यतः साफ सफाई आणि जागा समांतरीकरणाचे काम समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे डेपोचे मुख्य काम सुरू करण्यासाठी आवश्यक असणारी यंत्रसामग्री आणि मनुष्यबळ यांची उपलब्धता करून देण्याचे काम कंत्राटदारांनी सुरू केले आहे.

तसेच ट्रेनची प्रारंभिक डिझाईन चाचणी करण्याच्या अनुषंगाने आरे डेपो बाहेर सारीपुत नगर येथील रॅम्प नजिक ट्रेनचे डबे उतरवून घेणे, त्यांची जुळवणी करणे यासाठी तात्पुरती सुविधा निर्माण करण्यात आली आहे. अशी सुविधा निर्माण करण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य सरकारने यापूर्वीच आदेश दिले होते त्यानुसार ही सुविधा तयार करण्यात आली आहे. ही सुविधा मरोळ मरोशी मार्गाजवळील बोगद्याच्या तोंडाशी आहे. आठ डब्यांची एक ट्रेन आंध्र प्रदेशातील श्रीसिटी येथे तयार करण्यात आली आहे. या ट्रेनचे लवकरच मुंबईत आगमन होत आहे. याच मेट्रो ट्रेनच्या प्रारंभिक डिझाईन चाचण्या आता सुरू होणार आहेत. कारडेपोचे काम आणि डबे उतरवून घेण्यासाठीची सुविधा ही वेगवेगळी कामे असून एकाच वेळी हाती घेण्यात आलेली आहेत.

कुठल्याही मेट्रो प्रकल्पासाठी कार डेपो अतिशय महत्त्वाचा असतो. येथे ट्रेनची देखभाल रोज होते. तसेच प्रतिबंधात्मक, सुधारात्मक आणि दुरुस्तीची कामे येथे हाती घेण्यात येतात. यामुळे सर्व ट्रेन्स सुरळीतपणे धावण्यास मदत होते. प्रवाशांचा दैनंदिन प्रवास आरामदायी, वेगवान आणि सुरक्षित ठरण्या साठी कार डेपो एक महत्त्वाचा दुवा ठरतो. येथेच ट्रेन्स उभ्या करण्याची सुविधा असते. त्याच प्रमाणे चाकांची काळजी घेणे, ट्रेनची सफर सुरक्षित होण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी चाचण्या सुविधा उपलब्ध असतात. येथेच संचलन आणि नियंत्रण कक्ष देखील उपलब्ध असतो. मरोळ मरोशी मार्ग, सारीपुत नगराजवळील रॅम्प पासून मरोळ नाका मेट्रो स्थानकापर्यंतच्या ३ कि.मी. लांबीच्या ट्रॅकवर प्रोटोटाइप ट्रेनच्या चाचण्या होणार आहेत. येथेच उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या सुविधेत ट्रेन पार्क करण्यात येणार आहे. डेपोचे काम पूर्ण करून सीप्झ ते बी.के.सी.पर्यंतचा पहिला टप्पा २०२४ च्या पहिल्या तिमाहीत सुरु करण्याची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनची अपेक्षा आहे.