Narendra Modi, Devendra Fadnavis, Eknath Shinde Tendernama
मुंबई

Mumbai : टाटा एअरबस प्रकल्पाचे उद्घाटन गुजरातेत...चर्चा मात्र महाराष्ट्रात! कारण काय?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : गुजरातमध्ये (Gujrat) टाटा एअरबस (Tata Airbus) प्रकल्पाचे उद्घाटन होत असताना, महाराष्ट्र काँग्रेसने (Maharashtra Congress) सोशल मीडियावर एक जाहिरात अभियान सुरू केले आहे, ज्यामध्ये भाजपने (BJP) महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प गुजरातकडे वळवल्याचा आरोप करण्यात आला आहे. निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेसकडून हा मुद्दा चर्चेत आणण्याचा प्रयत्न केले जात असताना त्याला भाजप कसे 'काउंटर' करणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हा प्रकल्प सुरवातीला महाराष्ट्रासाठी प्रस्तावित होता, परंतु दिल्ली सरकारला मान देत महायुती सरकारने महाराष्ट्राच्या हक्कावर गदा आणून तो प्रकल्प गुजरातला देण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात ६२ लाखांहून अधिक युवक बेरोजगार असताना, महत्त्वाचे प्रकल्प गमावल्यामुळे रोजगार संधीवर किती गंभीर परिणाम झाला आहे, हे या जाहिरातीद्वारे अधोरेखित करण्यात आले आहे. महायुतीच्या सत्तेत, महाराष्ट्राला सुमारे ७.५ लाख कोटी रुपयांचे गुंतवणुकीचे नुकसान आणि ५ लाख संभाव्य रोजगार गमवावे लागले आहेत, ज्यामुळे लोकांमध्ये तीव्र संतापाची भावना पसरली आहे, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

काँग्रेसने अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत आणखी जाहिरातींच्या मालिकेद्वारे हे मुद्दे महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्राला गुजरातच्या फायद्यासाठी बाजूला सारणे योग्य नाही, असा संदेश निवडणुकीच्या तोंडावर देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. त्याला भाजपकडून कशा पद्धतीने प्रत्युत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.