मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा (Mumbai - Goa Highay) राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम आता अंतिम टप्प्यात आले आहे.
या कामात अडथळा निर्माण करणारा व घाटाच्या मध्यभागी असलेल्या कातळाचा बहुतांश भाग फोडण्यात यश आले. त्यामुळे आगामी पावसाळ्यापूर्वी येथील दोन्ही लेनचे काम पूर्ण होणार, हे स्पष्ट झाले आहे.
गेली अनेक वर्षे परशुराम घाटातील चौपदरीकरण विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरले. जमिनीचा मोबदला व मालकीवरून वाद निर्माण झाल्याने हे काम अडचणीत आले होते; मात्र आता घाटातील चौपदरीकरणाच्या कामाला वेग आला आहे.
चिपळूण हद्दीतील ईगल इन्फ्रा कंपनीमार्फत बहुतांशी काम पूर्ण झाले असून, त्यांच्या हद्दीतील केवळ २७० मीटरचे काँक्रिटीकरण शिल्लक आहे. एमआयडीसीची पाईपलाईन बदलण्यासाठी हे काम रखडले होते. मात्र, आता पाईपलाईनचे कामही पूर्ण झाले आहे.
खेड हद्दीतील कल्याण टोलवेज कंपनीमार्फत सुरू असलेले काम एका अवघड वळणावर येऊन थांबले होते. या ठिकाणी २२ मीटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला होता. आता कातळ फोडण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.
काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपल्याने त्या आधी घाटात चौपदरीकरणातील एकेरी मार्ग सुरू करण्यावर भर दिला आहे. त्याप्रमाणे कामाला गती मिळण्यासाठी २५ एप्रिलपासून दुपारी बारा ते सायंकाळी पाचदरम्यान घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती.
या कालावधीत परशुराम घाटातील जुन्या मार्गावर भरावाचे काम पूर्ण केले. त्यानंतर आता काँक्रिटीकरणाचे कामही तातडीने हाती घेण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी मागील तीन दिवस सातत्याने सपाटीकरणाचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत काँक्रिटीकरण पूर्ण करून पावसाळ्यापूर्वी घाटातील दोन्ही मार्ग वाहतुकीस खुले केले जाणार आहेत