Sion Road Bridge Tendernama
मुंबई

Mumbai : सायन पुलाचे तोडकाम तिसऱ्यांदा पुढे ढकलले; काय आहे कारण? पुढील मुहूर्त कधी?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सायन रेल्वे स्थानक (Sion Railway Station) येथील ब्रिटिश काळातील 110 वर्षे जुना पूल तोडण्याचे काम आता पावसाळा संपेपर्यंत पुढे गेले आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेचे कारण देत नियोजित पाडकाम पुन्हा पुढे ढकलण्यात आले आहे.

निवडणूक आचारसंहिता 4 जूनपर्यंत असल्याने व त्यावेळी पावसाळा सुरू होणार असल्याने पावसाळ्यात पुलाचे पाडकाम करणे अवघड होणार आहे. परिणामी पावसाळा संपल्यानंतर म्हणजे वर्षाअखेरच्या टप्प्यात पुलाचे पाडकाम करावे लागणार आहे.

मध्य रेल्वे मार्गावरील सायन रेल्वे स्थानकाच्या वरील भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग आणि एल.बी.एस. मार्ग यांना जोडण्यात महत्वाची भूमिका बजावणारा सायन पूल हा नागरिकांसाठी, प्रवासी व पादचारी यांसाठी खूपच महत्त्वाचा मानला जातो. या पुलावरून दररोज शेकडो दुचाकी, तीन चाकी, चार चाकी, बसगाड्या, मोठ्या व अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते.

हा पूल ब्रिटिश काळातील जुना पूल असून, हा पूल पाडून त्याऐवजी नवीन पुलाची उभारणी करणे गरजेचे झाले. त्यामुळे रेल्वे व महापालिकेने मिळून या पुलाचे बांधकाम तोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याच सुमारास माहिमच्या जत्रेचे कारण समोर आले असता पुलाचे जुने बांधकाम पाडण्याचे काम पुढे ढकलण्यात आले.

त्यानंतर इयत्ता 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा असल्याने त्यांची गैरसोय टाळण्यासाठी पुन्हा पुलाचे पाडकाम पुढे ढकलण्यात आले होते. तर आता बुधवारी रात्री पुलाचे पाडकाम करण्याचे नियोजन झालेले असताना लोकसभा निवडणूक आचारसंहिता लागू असल्याचे कारण देत पुन्हा तिसऱ्यांदा पुलाचे पाडकाम पुढे ढकलण्यात आले आहे.

निवडणूक आचारसंहिता 4 जूनपर्यंत तरी असणार आहे. पण त्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे. परिणामी पावसाळ्यात पुलाचे पाडकाम होण्याची शक्यता फारच कमी वाटते. त्यामुळे आता पावसाळा संपल्यानंतरच कदाचित कामाला सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे पुलाचे पाडकाम व्हायला जेवढा उशीर होईल तेवढाच पुलाच्या उभारणीला विलंब होणार आहे.