मुंबई (Mumbai) : मुंबईतील वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी मुंबई महापालिका प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी लिंकदरम्यान 10.58 किमीचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड बांधत आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत 66 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर प्रकल्पातील दुसऱ्या 2.070 किलोमीटरच्या महाकाय बोगद्याचे काम वेगाने सुरू असून दररोज 7 ते 8 मीटर खोदकाम होत आहे. दुसऱ्या बोगद्याचे आतापर्यंत 1800 मीटरहून जास्त काम पूर्ण झाले असून डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत उर्वरित 200 मीटरचे काम पूर्ण होईल, असा विश्वास कोस्टल रोडचे प्रमुख अभियंता मतैय्या स्वामी यांनी व्यक्त केला आहे. पहिल्या बोगद्याचे काम 10 जानेवारी 2022 ला पूर्ण झाले होते.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि मुंबई महापालिकेच्या माध्यमातून आकाराला येत असलेल्या 10.58 किलोमीटरच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पामुळे मुंबईतील वाहतूककोंडीचा प्रश्न सुटणार आहे. अरुंद रस्ते रस्त्यांवर दुतर्फा वाहनांची पार्पिंग, रोज शेकडो नवीन वाहनांची भर यामुळे अशा वाहतूककोंडी कमी करणाऱ्या आणि पर्यावरणस्नेही मार्गाची आवश्यकता होती. कोस्टल रोडच्या कामाचा प्रारंभ ऑक्टोबर 2018 मध्ये झाला आणि त्यानंतर कोस्टल रोडचे काम वेगाने सुरू झाले. कोरोना काळातही प्रकल्पाचे काम सुरू होते. सध्या कोस्टल रोडचे काम जलदगतीने सुरू असून नोव्हेंबर 2023 पर्यंत कोस्टल रोडचे काम पूर्ण होणार आहे.
प्रियदर्शिनी पार्क ते गिरगाव चौपाटीपर्यंतच्या दोन्ही बोगद्यांमध्ये प्रत्येकी तीन लेन असतील. जमिनीखाली 10 ते 70 मीटरपर्यंत बोगदे बनवले जात आहेत. बोगद्यांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी वायुविजनाची 'सकार्डो यंत्रणा' वापरली जाणार आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पालिका नियंत्रण कक्ष, पोलीस, वाहतूक पोलीस, अग्निशमन दलाला तत्काळ मेसेज जाऊन मदत घेता येणार आहे. देशातील हा पहिलाच प्रयोग आहे. बोगदा खोदणारा मावळा टनेल बोअरिंग मशीनचे वजन तब्बल 2300 टन आहे, तर व्यास 12.19 मीटर आहे. 'मावळा'द्वारे खोदकामात निघणाऱया दगड-माती-खडी सरीचा वापर भराव, रस्त्यासाठी केला जात आहे.
मुंबई महापालिका प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी लिंकदरम्यान 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधत आहे. या प्रकल्पामुळे 34 टक्के इंधनाची, तर 70 टक्के वेळेची बचत होणार आहे. शिवाय कोस्टल रोडमध्ये 70 हेक्टर एवढे हरित क्षेत्र उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प पर्यावणस्नेही ठरणार आहे. न्यायालयाच्या परवानगीमुळे नागरी सुविधांमधील 856 वाहनांच्या पार्किंगसह प्रसाधनगृह, जॉगिंग ट्रक, सायकल ट्रक, फुलपाखरू उद्यान, सागरी पदपथ, खुले नाटय़गृह, लहान मुलांसाठीची उद्याने व खेळाची मैदाने, पोलीस चौकी, बस थांबे, रस्ता ओलांडण्यासाठी भूमिगत फुटपाथ, जेट्टी अशी कामे वेगाने सुरू आहेत.