मुंबई (Mumbai) : मुंबईत सद्यस्थितीत सुमारे पाच हजारांवर बांधकामे सुरू आहेत. या कामांमधून उडणारी धूळ हवेत टिकून राहत असल्यामुळे हवेचा दर्जा खालावत आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून आता प्रदूषणकारी बांधकाम प्रकल्पांची तपासणी केली जाणार आहे. तसेच आवश्यक बाबींची दक्षता न घेणाऱ्या बांधकामांना 15 दिवसांची 'वर्क स्टॉप' नोटीस बजावली जाणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक भागात हवेची गुणवत्ता ढासळण्यास सुरुवात झाली असून येत्या काही दिवसांत हे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याने महापालिका सतर्क झाली आहे. मुंबईत सद्यस्थितीत सुमारे पाच हजारांवर बांधकामे सुरू आहेत.
या कामांमधून उडणारी धूळ हवेत टिकून राहत असल्यामुळे हवेचा दर्जा खालावत आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हिवाळ्यात आर्द्रता वाढल्यानंतर हे प्रमाण वाढत असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून मुंबईकरांना प्रदूषणाचा सामना करावा लागत आहे.
गतवर्षी प्रदूषणाचे प्रमाण वाढल्यामुळे 23 ऑक्टोबर रोजी महापालिकेकडून 27 प्रकारची नियमावली बांधकामांसाठी लागू करण्यात आली. यामध्ये यावर्षी दोन नियम वाढवण्यात आले असून बांधकामाच्या ठिकाणी शेकोटी पेटवण्यास आणि जेवण तयार करण्यासाठी धूर निर्माण करणारी चूल पेटवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
धुळीने होणारे प्रदूषण रोखण्यासाठी एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान 20 ते 30 फूट उंचीचे लोखंडी / पत्र्यांचे आच्छादन बंधनकारक करण्यात आले आहे. संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपड्याने झाकलेले असावे, बांधकामाच्या ठिकाणी प्रिंकलर असावेत, धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान चार-पाच वेळा पाण्याची फवारणी करावी, कामगारांना मास्क, चष्मा द्यावा.
रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी ऍण्टी स्मॉग मशीन लावावीत, प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी आदी उपाययोजनांची सक्ती ठेकेदारांवर करण्यात आली आहे.
आवश्यक खबरदारी न घेणाऱ्या ठेकेदारांवर महापालिकेकडून कारवाई सुद्धा केली जाणार आहे. सुरुवातीला बांधकामस्थळी नियमावलींची अंमलबजावणी होते किंवा नाही याची पाहणी करण्यात येणार आहे, त्यानंतर आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी नोटीस बजावण्यात येईल. नोटिसीनंतरही कार्यवाही न झाल्यास 'शो कॉज' नोटीस दिली जाईल व त्यानंतर 15 दिवसांची 'वर्क स्टॉप' नोटीस बजावली जाणार आहे.