Mumbai Tendernama
मुंबई

Mumbai : मुंबईतील हवेचे प्रदुषण रोखण्यासाठी बीएमसीचा मोठा निर्णय; बांधकामांच्या ठिकाणी 30 फुटांपर्यंत...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईत सध्या वाढलेले हवेचे प्रदूषण आणि हिवाळ्यात वाढणारे धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी बांधकामांच्या ठिकाणी तीस फुटांपर्यंत कंपाऊंड वॉल बनवणे बंधनकारक करण्यात येणार आहे.

शिवाय धुलीकणांना पसरण्यापासून आळा घालण्यासाठी 'स्मॉग गन' आणि स्प्रिंक्लरही बसवावे लागणार आहेत. यासाठी महापालिकेने नियमावलीत सुधारणा केली असून पुढील आठवड्यापासून याची अंमलबजावणी होणार आहे. तसेच महापालिकेने ३० अँटी स्मॉग गन खरेदी करण्यासाठी टेंडर मागवली आहेत.

मुंबईत सुमारे 5,000 बांधकामे आणि पायाभूत सुविधांचे प्रकल्पांचे काम सुरू आहेत. त्यामुळे मुंबईत गेल्या काही दिवसांपासून हवेचा दर्जा खालवला असून प्रदूषण वाढले आहे. मुंबईत सुरू असलेल्या प्रदूषणास बांधकामांची धूळ हे प्रमुख कारण असल्याचेही समोर आले आहे. यामुळे हवेचा स्तर (एक्यूआय - एअर क्वालिटी डंडेक्स) 132 इतका प्रचंड खाली घसरला आहे.

धूळ नियंत्रण करण्यासाठी महापालिकेच्या विभाग कार्यालयांच्या स्तरावर कृती दल अर्थात टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक विभागात तीन विषयांसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. मोकळ्या जागांवर डेब्रीज टाकताना आढळल्यास दहा ते 20 हजारांचा दंड आणि 'काम बंद' नोटीस बजावण्यात येणार आहे. यासाठी सर्व 24 वॉर्डमध्ये विशेष पथकाची नजर राहणार आहे.

रस्त्यांवर राडारोडा कचरा फेकणाऱ्यांवर आता आपत्कालीन विभाग आणि पोलिसांच्या माध्यमातून पाच हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजरही राहणार आहे.

तसेच महापालिकेने ३० अँटी स्मॉग गन खरेदी करण्यासाठी टेंडर मागवली आहेत. या मशिनचा वापर धुळीच्या कणांचा निपटारा करण्यासाठी बारीक धुक्यात पाणी फवारण्यासाठी केला जाणार आहे.