मुंबई (Mumbai) : गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता (Goregaon-Mulund Link Road) कामात येणाऱ्या उच्च दाबाच्या केबलचे स्थानांतरण करण्यात येणार आहे. या कामासाठी मुंबई महापालिका (BMC) सुमारे १२ कोटींचा खर्च करणार आहे.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या रस्ता रुंदीकरणामध्ये येणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या २२ के. व्ही. क्षमतेची ओव्हरहेड हायटेंशन वायर भूमिगत करून स्थानांतरित करणे तसेच इलेक्ट्रीक पोल, बॉक्सेस फोर पोल्स, फिडर्स स्थानांतरण करण्याला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे.
गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प हा चार टप्प्यांत विकसित करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात नाहूर रेल्वे स्थानकाजवळील मार्गांसह सध्याच्या रोड ओव्हर ब्रिजचे (आरओबी) रुंदीकरण समाविष्ट आहे. दुसऱ्या टप्प्यात विकास आराखड्यानुसार सध्याच्या ३० मीटर रुंद रस्त्याची पूर्ण रुंदी ४५.७० मीटरपर्यंत रुंदीकरण करण्यात येणार आहे. टप्पा तीन (अ) मध्ये उड्डाणपूल, एलिव्हेटेड बांधकाम समाविष्ट आहे. ज्याची कामे प्रगतीपथावर आहेत.
टप्पा तीन (ब) या टप्प्यात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खालील जुन्या बोगद्यासह फिल्मसिटी, गोरेगाव येथे बॉक्स बोगद्याचा देखील समावेश आहे. ज्यासाठी प्राथमिक कामे नोव्हेंबर २०२३ पासून सुरू झाली आहेत. चौथ्या टप्प्यात नाहूर ते ऐरोली टोल प्लाझापर्यंत पूर्व द्रुतगती महामार्ग ओलांडणारा प्रस्तावित द्विस्तरीय उड्डाणपूल आणि पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि जीएमएलआरच्या जंक्शनवर वाहन अंडरपास (व्हीयूपी) या कामांचा समावेश आहे.
गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या रस्ता रुंदीकरणामध्ये येणाऱ्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. यांच्या २२ के. व्ही. क्षमतेची ओव्हरहेड हायटेंशन वायर भूमिगत करून स्थानांतरित करणे तसेच इलेक्ट्रीक पोल, बॉक्सेस फोर पोल्स, फिडर्स स्थानांतरण करण्याबाबत स्थायी समितीने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोडच्या रस्ता रुंदीकरणामध्ये येणाऱ्या एलबीएस रोड, सोनापूर चौकरस्ता ते तानसा पाईपलाईन केबल स्थानांतरित करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी हे काम करणार असून महानगरपालिका त्यांना आर्थिक सहाय्य करणार आहे. ११ कोटी ९६ लाख ७६ हजार ९४५ रुपये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला दिले जाणार आहेत. त्यानंतर या कामाला सुरुवात केली जाईल. या कामाचा कालावधी कार्यादेश दिल्यापासून सहा महिने इतका आहे.