मुंबई (Mumbai) : तब्बल साडेसात हजार टन कार्बन उत्सर्जन कमी करुन पर्यावरण पूरक ऊर्जा निर्मितीत मुंबई एअरपोर्टने माईलस्टोन कामगिरी केली आहे. गेल्या एकाच वर्षात विमानतळावर तब्बल ९.४१ दशलक्ष युनिट सौर, पवनऊर्जेचा वापर केला गेला. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाने पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी करण्याच्या दिशेने वेगवान घोडदौड सुरु केली आहे.
मुंबई विमानतळाने विंडस्ट्रीम एनर्जी टेक्नोलॉजीच्या सहाय्याने 'व्हर्टिकल ॲक्सिस विंड टर्बाइन अँड सोलार पीव्ही' ही यंत्रणा विकसित केली आहे. या शाश्वत उपक्रमामुळे पारंपरिक विद्युतस्रोतांवरील अवलंबित्व कमी होण्यासह विमानतळाच्या 'शून्य कार्बन उत्सर्जना'च्या दिशेने सुरु असलेल्या प्रवासाला गती मिळाली आहे.
अधिकाधिक हरितऊर्जा वापरण्यासाठी मुंबई विमानतळाने १० केडब्ल्यूपी हायब्रिड सोलार मिल तैनात केली आहे. त्यात २ केडब्ल्यूपी टर्बोमिल आणि ८ केडब्ल्यूपी सोलार पीव्ही मॉड्युल्सचा समावेश आहे. यातून प्रतिदिन कमीत-कमी ३६ केडब्ल्यूएच ऊर्जानिर्मिती होईल. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार झालेली ऊर्जा गरजेनुसार वापरता येते. हे तंत्रज्ञान कोणत्याही हलत्या किंवा स्थिर छतावर सहजपणे बसविता येते, अशी माहिती देण्यात आली. 'पुनर्नविकरणीय हायब्रिड ऊर्जानिर्मिती' प्रकल्प सुरु करणारे मुंबई एअरपोर्ट देशातील पहिले विमानतळ ठरले आहे.
- आर्थिक वर्ष २१-२२ मध्ये मुंबई विमानतळाने ९.४१ दशलक्ष युनिट पुनर्नविकरणीय ऊर्जेचा (सौर आणि पवन) वापर केला.
- प्रत्यक्ष स्थळी निर्माण करण्यात आलेल्या ५.४६ दशलक्ष युनिट सौरऊर्जेचा आणि सुमारे ३.९४ दशलक्ष युनिट पवनऊर्जेचा समावेश आहे.
- अशा प्रकारे सौर आणि पवनऊर्जेचा वापर झाल्याने विमानतळावरील ७४०० टन कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे.