Undersea tunnel Tendernama
मुंबई

Mumbai Ahmedabad Bullet Train News : समुद्राखाली तयार होतोय बोगदा; काम युद्धपातळीवर सुरू

टेंडरनामा ब्युरो

Mumbai Ahmedabad Bullet Train News मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी वांद्रे कुर्ला संकुल ते शिळफाटा (BKC To Shilphata Tunnel) दरम्यान २१ किलोमीटरचा बोगदा बांधण्यात येत आहे.

या बोगद्याच्या एकूण लांबीपैकी १६ किलोमीटरचे खोदकाम तीन टनेल बोरिंग मशिन (टीबीएम TBM) द्वारे केले जाणार आहे, तर उर्वरित ५ किलोमीटरचे खोदकाम न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग पद्धती (एनएटीएम NATM) वापरून केले जाणार आहे.

टीबीएमसह १६ किलोमीटरचा हा भाग बांधण्यासाठी ७६ हजार ९४० सेगमेंट टाकून ७ हजार ४४१ रिंग तयार करण्यात येणार आहेत. बोगदा बनविण्यासाठी विशेष रिंग सेगमेंट टाकण्यात येत आहेत, प्रत्येक रिंगमध्ये नऊ वक्राकार भाग आणि एक मुख्य भाग आहे.

हा प्रत्येक विभाग २ मीटर रुंद आणि ०.५ मीटर जाडीचा आहे. या बोगद्यांची उच्च संरचनात्मक अखंडता आणि दीर्घकालीन टिकाऊपणा निश्चित करण्यासाठी हाय-स्ट्रेंथ एम७० ग्रेड काँक्रिटचा वापर केला जात आहे.

ठाणे जिल्ह्यातील महापे येथे ९८ हजार ८९८ चौरस मीटर (९.९ हेक्टर) क्षेत्रफळात कास्टिंग अँड स्टॅकिंग यार्ड सध्या सुरू करण्यात येत आहे. यार्डात साच्यांचे नऊ संच असतील म्हणजेच प्रत्येकी दहा तुकडे असतील. या साच्यांचे चार संच यापूर्वीच साइटवर बसविण्यात येत आहेत.

कास्टिंग ऑपरेशन्स प्रमाणात स्वयंचलित आणि यंत्रसामग्रीकरणासाठी विविध क्रेन्स, गॅन्ट्रीज आणि मशीन सुसज्ज आहे. जेणेकरून सेगमेन्ट्सच्या कास्टिंग आणि स्टॅकिंग दरम्यान उच्च दर्जा आश्वासन सुनिश्चित करता येईल. याशिवाय या सुविधेमध्ये कास्टिंग शेड, स्टॅकिंग एरिया, बॅचिंग प्लांट आणि स्टीम क्युरिंग एरियाचा समावेश असेल.

नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशन लिमिटेडकडून (एएचएसआरसीएल) सांगण्यात आले की, बोगद्याच्या बांधकामासाठी नवनवीन संशोधन करण्यात आले असून एकाच वेळी चार ठिकाणी काम सुरू करण्यात आले आहे. वांद्रे-कुर्ला संकुल, विक्रोळी आणि घणसोली येथे बोगद्याचे काम सुरू आहे.

या प्रकल्पाचा खर्च १.०८ लाख कोटी रुपये असून या प्रकल्पासाठी भारत सरकार एएचएसआरसीएलला १० हजार कोटी रुपये देणार आहे. तर गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांनी प्रत्येकी ५ हजार कोटी रुपये द्यायचे आहेत. उर्वरित रक्कम जपानकडून ०.१ टक्के व्याज दराने कर्जरुपात उपलब्ध होणार आहे. मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान ५०८ किलोमीटर लांबीचा हा मार्ग आहे.