Eknath Shinde Tendernama
मुंबई

Mumbai: 2200 कोटींचे 19 STP प्रकल्पांचे काम युद्धपातळीवर सुरू : CM

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईतील गोठे हलविण्याचा निर्णय सध्या न्यायप्रविष्ट असून, याबाबत न्यायालयाच्या निर्णयानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल. नदी परिसरात असलेल्या गोठ्यातील शेण व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी २२०० कोटींचे १९ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे (एस.टी.पी.) काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईतील व दहिसर, ओशिवरा, पोईसरसह मिठी नदी परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. एस.टी. प्लांटमुळे प्रक्रिया करून पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. यामुळे नद्या प्रदूषणमुक्त होतील. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्ष नेते अजित पवार, सदस्य योगेश सागर, छगन भुजबळ, मनीषा चौधरी, पृथ्वीराज चव्हाण, आशिष शेलार यांनी सहभाग घेतला.

मुंबईकरांसाठी शहरामध्ये विकासात्मक बदल करण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच उद्यानामध्ये पुरेशी स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सोय, विद्युत दिवे, सुरक्षा याबाबत विकास आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे महापालिका आयुक्तांना निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य आशिष शेलार यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुंबई महानगरपालिका हद्दीतील हायवेला चांगल्या दर्जाची स्वच्छतागृहे बांधण्यात येतील. महानगर पालिका क्षेत्रातील उद्यानांमध्ये ज्येष्ठ नागरिक तसेच मुले येत असतात. त्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. पोशा नाखवा मैदानातील दिव्यांच्या दुरुस्तीचे आदेश तत्काळ देण्यात येतील, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, सदस्य छगन भुजबळ, नाना पटोले, योगेश सागर, अजय चौधरी यांनी सहभाग घेतला.