MHADA Tendernama
मुंबई

Mumbai : 2 हजार मुंबईकरांना मिळाले हक्काचे घर! कोणाला लागली म्हाडाची लॉटरी?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ‘स्वप्न पूर्ण करणारे शहर’ म्हणून ओळख असलेल्या मुंबईत आपल्या हक्काचे घर असावे असे सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासन म्हाडाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. मुंबईकरांचे स्वतःच्या घराचे स्वप्न म्हाडाच्या माध्यमातून साकार होत असल्याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे (Atul Save) यांनी केले. (Mumbai MHADA Lottery News)

म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या २ हजार ३० सदनिकांच्या विक्रीसाठीची संगणकीय सोडत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे काढण्यात आली.

यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर-सिंह, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री सावे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रत्येकाला घर देण्याचे स्वप्न आहे. सर्वांसाठी घरे हे स्वप्न साकार होण्यासाठी ‘प्रधानमंत्री आवास योजना’, ‘मोदी घरकुल आवास योजना’ सुरू केल्या आहेत. या माध्यमातून अल्प, मध्यम उत्पन्न गटातील सर्वसामान्यांना घरे वाटप करण्यात येत आहेत.

राज्यात साडे सात लाख घरे बांधण्यात आली असून  यातली अडीच लाख घरे ही मुंबईमध्ये बांधली गेली आहेत. या लॉटरीसाठी २ हजार ३० घरांसाठी १ लाख १३ हजार पेक्षा जास्त अर्ज आले होते. ही सोडत मानवी हस्तक्षेपविरहित संपूर्णत: ऑनलाईन अशा संगणकीय प्रणालीद्वारे प्रक्रिया राबविण्यात आली आहे. नाशिक, पुणे, कोकण, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या शहरात पारदर्शकपणे लॉटरी प्रक्रियेमार्फत लोकांना घरे मिळाली आहेत.

मुंबई शहर आणि परिसराचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे घरांची मागणी ही वाढत आहे. मुंबईत ही दुसरी सोडत असून लवकरच आणखी घरांची सोडत होईल. अभ्युदय नगर, कामाठीपुरा, शहरातील जुन्या वस्त्या येथील पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागत आहे. राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच आणले जाणार असून गृहनिर्माण धोरणामध्ये परवडणाऱ्या व टिकाऊ घरांवर भर दिला जाणार असल्याचे सावे यांनी यावेळी सांगितले.

अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंह म्हणाल्या की, म्हाडा म्हणजे विश्वास. म्हाडाचे घर मिळण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी सहभाग घेतला यावरूनच लोकांचा म्हाडावर किती विश्वास आहे हे लक्षात येते. एक स्थिर आणि सुरक्षित घर सर्वांचं स्वप्न आहे. या लॉटरी प्रक्रियेने ते स्वप्न पूर्ण होत आहे.

जयस्वाल म्हणाले, २ हजार ३० सदनिकांच्या विक्रीकरिता सोडत करण्यात आली आहे. यासाठी अनामत रकमेसह १ लाख १३ हजार ८११ अर्ज पात्र होते. गेल्या वर्षभरात मुंबईमध्ये दुसऱ्यांदा लॉटरी प्रक्रिया राबविण्यात आली आहे. लोकांच्या मागणीनुसार सदनिकांचे दरही कमी करण्यात आले आहेत.

सोडतीत सहभाग घेतलेल्या अर्जदारांची संख्या लक्षात घेता मंडळातर्फे व्यापक नियोजन करण्यात आले होते. तसेच अर्जदारांना सोयीस्कररीत्या निकाल पाहता यावा याकरिता सभागृहाच्या आवारात व सभागृहात एलईडी स्क्रीन लावण्यात आले होते.

या प्रकल्पात मुंबईतील गोरेगाव, मालाड, जुहू, दादर, वरळी, ताडदेव, वडाळा, कन्नमवारनगर, पवई यासह अन्य काही ठिकाणच्या एकूण दोन हजार ३० घरांसाठी ९ ऑगस्ट ते १९ सप्टेंबर दरम्यान अर्ज विक्रीची प्रक्रिया राबविण्यात आली होती.