मुंबई (Mumbai) : 'हौशेला मोल नसते' असे म्हणतात. आपली हौस पूर्ण करण्यासाठी कुठलिही किंमत मोजण्याची तयारी असलेल्यांची 'मॅक्झिमम सिटी' मुंबईत कमतरता नाही. अशाच एका हौशी व्यक्तीने मुंबईत वरळी सी फेसवर 'सपनों का महल' खरेदी करण्यासाठी तब्बल 144 कोटी रुपये मोजले आहेत. एवढेच नाही तर या व्यवहारात तब्बल ७.२० कोटी रुपये मुद्रांक शुल्कापोटी सरकारी तिजोरीत जमा झाले आहेत.
आयनॉक्स समूहाचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन यांनी दक्षिण मुंबईतील वरळी परिसरात समुद्र किनाऱ्यावर एक अलिशान अपार्टमेंट नुकतेच खरेदी केले आहे. या अपार्टमेंटची किंमत तब्बल 144 कोटी रुपये आहे.
मुंबईत लक्झरी घरांना मोठी मागणी
ही मालमत्ता जैन यांनी रहेजा युनिव्हर्सल प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आशिष रहेजा यांच्याकडून खरेदी केली आहे. 31 मार्च रोजी हा व्यवहार पूर्ण झाल्याची माहिती समोर येत असून, या व्यवहारासाठी जैन यांनी तब्बल 7.20 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क भरले आहे. या व्यवहारांबाबत बोलताना सीआरई मॅट्रिक्स आणि इंडेक्सटॅपचे सीईओ अभिषेक किरण गुप्ता यांनी म्हटले आहे की, सध्या मुंबईमध्ये लक्झरी घरांना मोठ्याप्रमाणात मागणी आहे. अशी मालमत्ता जर प्राईम लोकेशनला असेल तर चढ्या दराने देखील ती मालमत्ता खरेदी केली जाते. असे अनेक व्यवहार यापूर्वी देखील मुंबईत झाले आहेत.
एकाच वेळी २० गाड्यांच्या पार्किंगची सोय
आयनॉक्स समूह मनोरंजन, औद्योगिक वायू आणि क्रायोजेनिक्स उपकरणाच्या क्षेत्राशी संबंधित आहे. आयनॉक्स समुहाचे कार्यकारी संचालक सिद्धार्थ जैन यांनी ही अपार्टमेंट खरेदी केली आहे. ही अपार्टमेंट अलिशान असून, वरळी सारख्या प्राईम लोकेशनला आहे. सध्या मु्ंबईतील वरळी परिसरातील घरांना मोठी मागणी आहे. या अपार्टमेंटमध्ये प्रशस्त फ्लॅट असून, तब्बल वीस गाड्या एकाच वेळी पार्क करता येतील एवढे पार्कींग आहे. ही इमारत सर्व सोईसुविधांनी युक्त अशी आहे. 31 मार्च रोजी हा व्यवहार पूर्ण झाल्याची माहिती समोर येत आहे.
वरळी सी फेस 'हॉट डेस्टिनेशन'
दरम्यान यापूर्वी देखील मालमत्ता खरेदी विक्रीचे असे व्यवहार झाले आहेत. गेल्या वर्षी एसआयएल इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड या कंपनीने रहेजा लीजेंडमध्ये 78 कोटी रुपयांना डुप्लेक्स अपार्टमेंट विकत घेतले होते. त्यानंतर एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडचे मुख्य गुंतवणूक अधिकारी प्रशांत जैन आणि त्यांच्या पत्नीने देखील वरळी सी फेस परिसरात तब्बल 19.36 कोटींना अपार्टमेंट खरेदी केली होते. तर 2021 मध्येच एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख यांच्या पत्नी स्मिता डी. पारेख यांनी वरळीमध्येच पन्नास कोटींना एक अपार्टमेंट खरेदी केली होती.