मुंबई (Mumbai) : बुलेट ट्रेनवर लाखो करोडो रुपयांचा खर्च करण्यापेक्षा बदलापूरपासून मुंबईपर्यंतच्या ट्रेनची व्यवस्था चांगली करायला हवी; मात्र महायुतीच्या सरकारला ते जमले नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केली.
मुरबाड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार यांच्या प्रचारार्थ गुरुवारी बदलापुरातील सभेत त्यांनी महायुतीला लक्ष्य केले. लोकसभेला या मतदारसंघात तुतारीच वाजली, त्यामुळे आता विधिमंडळात राज्यात परिवर्तन होऊन महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचाराविरोधात महाविकास आघाडीची तुतारी वाजणार असल्याचे प्रतिपादनही खासदार सुळे यांनी केले.
राज्यात महागाईचा प्रश्न मोठा आहे. लाडक्या बहिणीला एका हाताने १,५०० रुपये दिले आणि दुसऱ्या हाताने काढून घेतल्याची टीका त्यांनी केली. बुलेट ट्रेनवर करोडो रुपयांचा खर्च करण्यापेक्षा बदलापूरपासून मुंबईपर्यंतच्या ट्रेनची व्यवस्था चांगली करायला हवी; मात्र महायुतीच्या सरकारला ते जमले नसल्याचे सुळे म्हणाल्या. बुलेट ट्रेनसाठी करोडो रुपये खर्च करतात; पण मुलांच्या शिक्षणासाठी निधी नाही, पाण्याचा प्रश्न सोडवत नाहीत. त्यामुळेच राज्यात परिवर्तन करण्याचे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. यावेळी महाराष्ट्र कुणासमोर झुकला नाही आणि झुकणार नाही. राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून दिलेल्या संविधानाने चालणारे सरकार असेल, असा टोला त्यांनी महायुती सरकारला लगावला.
यावेळी महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर पाच वर्षांत महागाई वाढणार नाही, महिलांना महिना तीन हजार आणि बेरोजगारांना भत्ता म्हणून चार हजार आणि वर्षभरात लाखांहून अधिक बेरोजगारांना नोकऱ्या देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले. मुरबाड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सुभाष पवार हे तुमच्यातील उमेदवार आहेत. तुमच्या सुख-दुःखात सामील होणारे आहेत. त्यामुळे यंदा रामकृष्ण हरी बोलत वाजवा तुतारी, असे म्हणत महाविकास आघाडीला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.
'काचेचा पूल दिसलाच नाही'
मुरबाडमध्ये काचेचा पूल काही दिसला नाही, असे म्हणत महायुतीच्या आमदारांवर खासदार नीलेश लंके यांनी टीका केली. तसेच, महायुती सरकारने स्वार्थासाठी लाडकी बहीण योजना राबवली; पण याच बहिणींचा वेळोवेळी अपमानदेखील केला. या मतदारसंघात विकास झाला नाही. त्याचा बॅकलॉग आता महाविकास आघाडी भरून काढणार असून लाडक्या बहिणींना दर महिना तीन हजार, मोफत एसटी प्रवास, शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव, शेतकऱ्यांना कर्जातील रकमेतून ५० हजारांची सूट देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महाविकास आघाडीचे उमेदवार सुभाष पवार, खासदार सुरेश म्हात्रे, माजी आमदार गोटीराम पवार, शहराध्यक्ष कालिदास देशमुख, प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख आदींसह काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या ज्योती ठाकरे, शहरप्रमुख किशोर पाटील, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अनेक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.