Metro Tendernama
मुंबई

भिवंडी-कल्याण भूमिगत मेट्रोसाठी लवकरच टेंडर; डीपीआर अंतिम टप्प्यात

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : भिवंडी-कल्याण मेट्रोच्या कामाच्या सविस्तर प्रकल्प आराखड्याला (डीपीआर) अंतिम मान्यता देण्याची प्रक्रिया सुरू असून, लवकरच टेंडर काढले जाईल. त्यानंतर भूमिगत भिवंडी-कल्याण मेट्रोच्या कामाला सुरुवात होईल, असा विश्वास महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या ठिकाणाची पाहणी केल्यानंतर महायुतीचे उमेदवार कपिल पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो प्रकल्पाच्या कामाचे टेंडर काढण्यात आले. मात्र, त्यानंतर राज्य सरकार बदलल्यामुळे मेट्रोच्या मार्गाबाबत वाद निर्माण केला गेला. त्यानंतर काही जणांची घरे वाचविण्यासाठी मार्ग बदलण्याचा घाट घातला गेला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या काळात मेट्रोचे काम झाले नाही. आता लवकरच टेंडर निघून कामाला सुरुवात होईल, असे कपिल पाटील यांनी सांगितले.

महाविकास आघाडीच्या सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गासाठी राज्य सरकारकडून ५० टक्के रक्कमेची हमी देणारे पत्र दिले गेले नाही. त्यामुळे मुरबाड रेल्वेचे काम रखडले, असा आरोपही कपिल पाटील यांनी केला. मुंबईला पाणीपुरवठा करणारा तालुका अशी शहापूर तालुक्याची ओळख आहे. मात्र, तालुक्याच्या काही भागाला पाणीटंचाई जाणवते. त्यासाठी भावली धरणातून पाणीटंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करण्याची योजना मंजूर करण्यात आली. जल जीवन मिशनमधून १६०० कोटींची कामे मंजूर झाली असून, महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविण्याचे काम मोदी सरकारने केले आहे, असे कपिल पाटील यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत शेतकऱ्यांसाठी अनेक निर्णय झाले असून, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी टप्प्याटप्प्याने लागू केल्या जात आहेत. मात्र, कृषी मंत्रीपदावर दहा वर्ष असतानाही व राज्य सरकारही त्यांचे असताना ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी काहीही केले नाही.

इतकेच नव्हे तर ४५ वर्षांपूर्वी झालेल्या भातसा धरणातील १८ टक्के पाणी शेतकऱ्यांच्या सिंचनासाठी आरक्षित असताना आरक्षण बदलले गेले. तर डावा व उजव्या कालव्याचे काम रखडलेले आहे. यापुढील काळात कालव्यांसाठी वन खात्याच्या अडचणी दूर करून पाणी सिंचनासाठी उपलब्ध करण्याचे कार्य केले जाईल, अशी ग्वाही कपिल पाटील यांनी दिली. दहा वर्षात काय काम केले, असा प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तींनी महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात काय केले, याचे उत्तर द्यावे, असा टोलाही कपिल पाटील यांनी लगावला.