Vasai Virar Municipal Corporation Tendernama
मुंबई

वसई-विरार महापालिकेचा वाहतूक कोंडीवर ५५० कोटींचा मास्टर प्लॅन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : वसई विरार शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी महापालिकेने ४ रेल्वे उड्डाणपूल आणि रस्त्यावरील १२ उड्डाणपुलांचा प्रस्ताव नव्याने एमएमआरडीएकडे सादर केला आहे. या दोन्ही प्रस्तावांची एकत्रित किंमत सुमारे ५५० कोटी इतकी आहे.

वसई विरार शहरात झपाट्याने नागरीकरण होत आहे. नवनवीन वसाहती विकसित होत आहेत. वसई विरार शहराचे क्षेत्रफळ ३८० चौरस किलोमीटर एवढे आहे. शहराची लोकसंख्या २५ लाखांच्या घरात गेली आहे. शहरातील रस्ते अरुंद असून त्यावर वाहनांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी ही शहराच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी होत असते. त्यासाठी रेल्वे उड्डाणपूल (आरओबी) बांधण्याची संकल्पना समोर आली होती. त्यानुसार नायगाव पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा उड्डाणपूल तयार करण्यात आला असून विरारमधील नारिंगी येथे रेल्वे उड्डाणपूल तयार करण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. या दोन उड्डाणपूलांशिवाय शहरातील अन्य भागातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने शहरात ४ रेल्वे उड्डाणपुलांचा प्रस्ताव तयार केला असून तो मंजुरीसाठी एमएमआरडीएकडे पाठवला आहे. त्यामध्ये उमेळमान (वसई), ओस्वाल नगरी (नालासोपारा) अलकापुरी (नालासोपारा) आणि विराट नगर (विरार) या चार उड्डाणपुलांचा समावेश आहे. या ४ पुलांच्या निर्मितीसाठी १५५ कोटींचा खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती बांधकाम विभागाने दिली आहे.

आम्ही शहरात आणखी ४ रेल्वे उड्डाणपुलांचा प्रस्ताव तयार केला आहे. हे उड्डाणपूल तयार झाल्यास पूर्व आणि पश्चिमेकडील कोंडीची समस्या ५० टक्क्यांनी कमी होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, असा विश्वास आयुक्त अनिलकुमार पवार यांनी व्यक्त केला आहे. लवकरात लवकर हे उड्डाणपुलांच्या कामांना मंजुरी मिळावी यासाठी आम्ही एमएमआरडीएकडे पाठपुरावा करत आहोत, असेही आयुक्त पवार यांनी सांगितले. शहरातील वाहतूक कोंडीचा अभ्यास करण्यासाठी मेसर्स टंडन अ‍ॅण्ड कंपनीला सर्वेक्षणाचे काम दिले होते. त्यांनी शहराचे रस्ते, वाढती लोकसंख्या, वाहने यांचा अभ्यास करून आपला अहवाल सादर केला होता. त्यानुसार शहरात १२ उड्डणपुलांची गरज व्यक्त करण्यात आली होती. शहरातील भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पालिकेने वाहतूक कोंडी होणारे प्रमुख नाके आणि रस्त्यांवर १२ उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा प्रस्ताव २०१४-१५ मध्ये एमएमआरडीएकडे प्रस्वाव सादर करण्यात आला होता. मात्र त्याला मंजुरी मिळाली नव्हती. आता पालिकेने या १२ उड्डाणपुलांचा प्रस्ताव देखील नव्याने सादर केला आहे. २०१४-१५ मध्ये या १२ उड्डाणपुलांच्या निर्मितीचा अपेक्षित खर्च २३९ कोटी ९३ लाख रुपये एवढा होता. २०२२-२३ मध्ये अपेक्षित खर्च ३९५ कोटी ६८ लाख एवढा झाला आहे. म्हणजे ८ वर्षांत अपेक्षित खर्चात ६५ टक्के म्हणजे १५५ कोटी ७५ लाख एवढी वाढ झाली आहे.