Atul Setu Tendernama
मुंबई

Atal Setu MTHL : पावसाळ्यातही अटल सेतूवर वाहने धावणार सुसाट, कारण...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अटल सेतू अर्थात एमटीएचएल सागरी सेतू पावसाळ्यातही अविरत सुरू रहावा यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. सागरी सेतूवर पाणी साचण्यास प्रतिबंध करण्यासाठी ड्रेनेज सिस्टीमच्या देखभाल दुरुस्तीची कामे पूर्ण करण्यात आल्याची माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने दिली आहे. 

अटल सेतू खुला झाल्यामुळे नवी मुंबई आणि मुंबई या शहरांमधील अंतर मोठ्या फरकाने कमी झाले आहे. देशातील सर्वात मोठा सागरी सेतू अशी ओळख असणाऱ्या अटल सेतूवरून सुरु होणारा प्रवास तुम्हाला अपेक्षित स्थळी किमान वेळात पोहोचवतो. पावसाळ्यात अटल सेतूवर पाण्याचा निचरा करण्यासाठी वेगवेगळ्या क्षमतेचे पाणी उपसा करणारे पंप बसवण्यात आले आहेत. अटल सेतू प्रकल्पासाठी १ अभियंता आणि १० मजुरांचे आपत्कालीन प्रतिसाद दल स्थापन करण्यात आलेले आहे.

प्रकल्पासंबंधित तक्रार नोंदणीसाठी आणि विविध विभागांशी समन्वय साधण्यासाठी २४ तास आपत्ती नियंत्रण कक्ष देखील सुरु करण्यात आला आहे. अटल सेतूवरील गाड्यांच्या माध्यमातून होणारी तेल गळती किंवा इतर निसरड्या पदार्थांसारख्या संभाव्य स्लिप आणि ट्रिप धोक्यांचे निवारण करण्यासाठी ऑपरेशन आणि मेंटेनन्स टीम आणि अग्नी शमन वाहन (FRV) टीम द्वारे पुलावर वेळोवेळी गस्त घालण्यात येणार आहे. जेणेकरून अपघातांना आळा घालता येईल. पावसाळ्याच्या कालावधीत, अतिवृष्टी आणि पुरामुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही समस्यांचे तत्काळ निवारण करण्यासाठी प्रकल्पात अतिरिक्त व्हिज्युअल तपासणी करण्यात येणार आहे.

अटल सेतूसाठी आपत्कालीन टोल फ्री क्रमांक- १८०० २०३ १८१८