MMRDA Tendernama
मुंबई

Mumbai Metro-12 : 'MMRDA'ने काढले 'या' कामांसाठी टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगरात मेट्रोद्वारे प्रभावी सार्वजनिक वाहतूक सेवा उभारण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण 'एमएमआरडीए' (MMRDA) प्रयत्नशील आहे. एमएमआरडीएने सध्या गायमुख ते शिवाजी चौक (मिरा रोड) दरम्यानच्या मेट्रो मार्ग १० साठी विविध परवानग्या मिळविण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच, मेट्रो मार्ग १२ (कल्याण तळोजा) साठी सामान्य सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे आणि स्थापत्य कामांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू केली आहे.

मुंबई महानगर प्रदेशातील ६ मुंबई मेट्रो मार्गांसाठी एकूण ४९२९ मेट्रोचे खांब उभारण्यात येणार आहेत. त्यापैकी ३६०३ म्हणजेच जवळपास ७३ टक्के खांबांची उभारणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. मुंबईसारख्या गजबजलेल्या मार्गांवर पूर्वनिर्मित घटक वेगवेगळ्या कास्टिंग यार्ड्सवर तयार करून बांधकाम स्थानावर नेले जातात. ३५० ते ५०० मेट्रिक टन क्षमतेसह क्रेन वापरून उभारले जातात. त्यामुळे महामार्गावरील तसेच सार्वजनिक वाहतुकीतील व्यत्यय कमी करून सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मेट्रोचे बहुतांश बांधकाम रात्रीच्या वेळी करण्यात येते, असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली.

दरम्यान, "उपनगरीय रेल्वे आणि बस सेवा यांच्यावरील ताण दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे एमएमआरडीए मुंबई महानगर प्रदेशातील सर्व मेट्रो कॉरिडॉर शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्यास प्राधान्य देत आहे. नुकतेच उद्घाटन झालेले मेट्रो मार्ग २अ आणि ७ हे मार्ग लाखो प्रवाशांना दिलासा देत आहेत. एमएमआरडीएने सध्या गायमुख ते शिवाजी चौक (मिरा रोड) दरम्यानच्या मेट्रो मार्ग १० साठी विविध परवानग्या मिळविण्यासाठी सल्लागार नेमण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. याव्यतिरिक्त, मेट्रो मार्ग १२ (कल्याण तळोजा) साठी सामान्य सल्लागार नियुक्त करण्यात आला आहे आणि स्थापत्य कामांसाठी टेंडर प्रक्रिया सुरू असल्याचे महानगर आयुक्त, एमएमआरडीए डॉ. संजय मुखर्जी यांनी सांगितले.

मेट्रो प्रकल्प आणि खांबांची सद्यस्थिती :

• मेट्रो मार्ग २ब (डीएन नगर ते मंडाले):

भौतिक प्रगती : ५०.७%

पूर्ण झालेले खांब: ११०९ पैकी ६१४

• मेट्रो मार्ग ४ (वडाळा ते कासार वडवली):

भौतिक प्रगती: ५५%

पूर्ण झालेले खांब: १४७६ पैकी ९७३

• मेट्रो मार्ग ४अ (कासारवडवली - गायमुख)

भौतिक प्रगती: ५८.०८

पूर्ण झालेले खांब: २२१ पैकी १४३

• मेट्रो मार्ग ५ टप्पा १ (ठाणे ते भिवंडी):

भौतिक प्रगती: ७८.४%

पूर्ण झालेले खांब : ४६४ पैकी ४४०

• मेट्रो मार्ग ६ (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी):

भौतिक प्रगती: ७०.७५ %

पूर्ण झालेले खांब: ७६९पैकी ६५७

•मेट्रो मार्ग ९ (दहिसर ते मीरा भाईंदर):

भौतिक प्रगती : ६१.२८%

पूर्ण झालेले खांब : ९०० पैकी ७७६