Mumbai Metro Tendernama
मुंबई

MMRDA 'ते' 2 मेट्रो मार्ग जोडणार; 6 हजार कोटींचे नव्याने टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कल्याण, डोंबिवली ते तळोजाहून नवी मुंबई दरम्यान मेट्रो रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीसाठी मेट्रो 12 आणि नवी मुंबई मेट्रो एकमेकांना जोडण्यात येणार आहेत. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो 12 आणि नवी मुंबई मेट्रो जोडण्यासाठी मेट्रो 12 च्या डिझाईनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर नव्या डिझाईनसह मेट्रो 12 प्रकल्पासाठी सुमारे ६ हजार कोटींचे टेंडर पुन्हा काढण्यात येणार आहे. हे दोन्ही मेट्रो मार्ग जोडल्याने तासांचा प्रवास अगदी काही मिनिटांत पूर्ण होणार आहे.

मेट्रोचे हे दोन मार्ग जोडण्यासाठी मेट्रो 12च्या मार्गावर जवळपास 700 मीटरचा विस्तार करण्यात येणार आहे. मेट्रो मार्गाचा विस्तार करुन, एमएमआरडीए तळोजाजवळील मेट्रो 12 आणि नवी मुंबई मेट्रोला जोडण्याच्या योजनेवर काम करीत आहे. कल्याण ते तळोजा दरम्यान मेट्रो 12 कॉरिडॉर बांधण्यात येणार आहे, तर नवी मुंबईतील बेलापूर ते पेंधर दरम्यानचा मेट्रो कॉरिडॉर यापूर्वीच बांधण्यात आला आहे.

20.75 किलोमीटर लांबीच्या मेट्रो 12 कॉरिडॉरची पायाभरणी काही वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आली होती. प्रकल्पाचे बांधकाम सुरु करण्यापूर्वी टेंडर मागवण्यात आले होते. सुमारे 5,865 कोटी रुपयांच्या या प्रकल्पासाठी अनेक कंपन्यांनी टेंडर दाखल केले होते. मात्र, मेट्रो 12 ते नवी मुंबई मेट्रोला जोडण्याचा प्रस्ताव ठेवल्यामुळे डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यामुळे एमएमआरडीएला आधीचे हे टेंडर रद्द करावे लागले आहे. लवकरच नव्या डिझाईनसह पुन्हा टेंडर काढण्यात येणार आहे.

सध्या कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना नवी मुंबईत येण्यासाठी रेल्वे किंवा रस्तेमार्ग हा एकच पर्याय आहे. रस्त्याने नवी मुंबई गाठण्यासाठी एक ते दीड तासांचा प्रवास लागतो. तसेच, लोकल मार्गाने प्रवास करायचा झाल्यास ठाण्यात यावे लागते आणि पुन्हा दुसरी लोकल पकडून नवी मुंबईला जावे लागते. त्यामुळे हे दोन्ही मेट्रो मार्ग जोडल्याने तासांचा प्रवास अगदी काही मिनिटांत पूर्ण होणार आहे.

मेट्रो 5 कॉरिडॉरला मेट्रो 12 जोडणार -
त्याचबरोबर ठाणे-भिवंडी-कल्याण दरम्यान प्रस्तावित मेट्रो 5 कॉरिडॉरलाही मेट्रो 12 जोडण्यात येणार आहे. त्यामुळे ठाणे, भिवंडी, कल्याण, डोंबिवली, तळोजा, बेलापूर आणि नवी मुंबईदरम्यान दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर होणार आहे.