Garbage Processing Plant  Tendernama
मुंबई

MMRDA : बदलापुरातील 150 कोटींच्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे कंत्राट 'या' कंपनीला

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) बदलापूर येथे अत्याधुनिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या बांधकामाला लवकरच सुरवात होणार आहे. 'आर अ‍ॅण्ड बी प्रोजेक्ट्स लिमिटेड' या कंपनीला हे काम मिळाले असून या प्रकल्पावर सुमारे १५० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या प्रकल्पात दैनंदिन सुमारे ६५० टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे.

या प्रकल्पामुळे अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तीन शहरांचा कचरा प्रश्न मार्गी लागणार आहे. उल्हासनगर, अंबरनाथ या शहरांसाठी स्वत:ची कचराभूमी नाही. हा मुद्दा राष्ट्रीय हरित लवादातही पोहोचला होता. लवादाच्या मार्गदर्शक सूचनांनंतरही कचराभूमीचा प्रश्न सुटला नव्हता. मात्र, आता बदलापूर नगरपालिकेच्या कचराभूमीवर या दोन्ही महापालिकांनाही जागा मिळाली आहे. या ठिकाणी नियोजित असलेल्या अत्याधुनिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या कामाचे कंत्राट 'आर अ‍ॅण्ड बी प्रोजेक्ट्स लिमिटेड' कंपनीला देण्यात आले आहे.

अंबरनाथ आणि उल्हासनगर नगरपालिकांकडे कचराभूमीसाठी स्वतंत्र जागा नाही. बदलापूर शहराची कचराभूमी शहरापासून दूर, दगडखाणीजवळ आणि मोठी असल्याने येथे प्रकल्प उभारण्याचे निश्चित करण्यात आले. बदलापूर नगरपालिकेच्या २४ एकरांपैकी १३ एकर जागा ही प्रकल्प उभारण्यासाठी वापरली जाणार आहे. एकूण १४८ कोटी ६८ लाखांच्या खर्चापैकी उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका एकूण १९.८२ कोटी रुपयांची मदत करणार आहे. तर, सुमारे १२८ कोटी ८८ लाख रुपये एमएमआरडीएच्या माध्यमातून मिळणार आहेत.

या घनकचरा प्रकल्पात कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यावर प्रक्रिया केली जाणार असून त्याचा पुनर्वापर करण्याचेही नियोजन आहे. या ठिकाणी ६४१ टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. त्यातील सर्वाधिक ३४० टन कचरा उल्हासनगर महापालिकेचा तर, अंबरनाथ आणि बदलापूरचा अनुक्रमे २०३ आणि ९७ टन कचरा असेल.