Tilak Hospital Mumbai Tendernama
मुंबई

Mumbai : टिळक रुग्णालय पुनर्विकासाचे टेंडर का रखडले? दोषींवर कारवाई होणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : "सायनमधील टिळक रुग्णालयाच्या पुनर्विकासाच्या टेंडर प्रक्रियेत झालेल्या विलंबाची प्रशासकीय चौकशी केली जाणार आहे. या चौकशीमध्ये कोणी अधिकारी दोषी आढळला, तर संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई होईल," अशी घोषणा कॅबिनेट मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी विधानसभेत केली आहे.

भाजप आमदार कॅप्टन तामिळ सेल्वन यांनी मुंबई महापालिकेच्या लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी कॅप्टन तामिळ सेल्वन यांनी रुग्णालयाच्या दुरावस्थेवर भाष्य केले. टेंडर प्रक्रियेला विलंब झाल्यामुळे रुग्णालयाच्या इमारतीचा पुनर्विकास होऊ शकला नाही, असा आरोप केला. सायन रुग्णालयात 3 हजार 600 बेडचे रुग्णालय करण्याची योजना होती. पण ती पूर्ण झाली नसून त्याचा पुनर्विकास झालेला नाही. एका बेडवर दोन रुग्ण आयसीयूमध्येही हीच स्थिती आहे. टेंडर कमिटीने डॉक्टर्स आणि नर्सेसच्या क्वार्टर्सचे टेंडर काढले पण रुग्णालयाच्या इमारतीचे टेंडर काढले नाही. वारंवार बैठक घेतल्या जाऊनही दररोज 2 ते 3 मृत्युमुखी पडत आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त बदलले, पण रुग्णालय इमारतीचा पुनर्विकास झाला नाही. याची जबाबदारी कोणाची? असा सवाल करत सेल्वन यांनी अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांच्यावर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली.

सायनमध्ये दोनच एमआरआय मशिन्स असून एक्स रे मशिन्सही कमी आहेत. 30 पेक्षा अधिक डायलिसीस करू शकत नाही. शस्त्रक्रीयेसाठी एक-दीड महिना थांबावे लागते," याकडेही कॅप्टन तामिळ सेल्वन लक्ष वेधले. यावर उत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांबाबत राज्य सरकार गंभीर आहे. ज्या रुग्णालयांमध्ये सिटीस्कॅन व इतर यंत्र बंद आहेत. त्या रुग्णालयामध्ये पुढील 30 दिवसामध्ये यंत्र सुरु करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले जाणार आहेत. यंत्र सुरु केली नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. नायर रुग्णालयात दोन सिटी स्कॅन यंत्र खरेदीला मंजुरी दिली जाईल, अशी घोषणाही सामंत यांनी केली. दरम्यान, मुंबई महापालिका रुग्णालयातील विविध प्रश्नांवर मुंबईतील सर्व लोकप्रतिनिधींची बैठक पुढील मंगळवारी बोलावण्याचे आश्वासन यावेळी उदय सामंत यांनी दिले.