Uday Samant Tendernama
मुंबई

Uday Samant : मुंबई महापालिकेतील स्वच्छता कंत्राटाचे टेंडर तत्काळ स्थगित करणार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई शहरातील झोपडपट्टीतील स्वच्छतेसाठी नव्या कंपन्यांना काढण्यात येणारे टेंडर तातडीने स्थगित करण्यात येणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी विधान परिषद सांगितले.

सदस्य प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देतांना मंत्री सामंत बोलत होते. सामंत म्हणाले, सद्यःस्थितीत स्वच्छतेची कामे बेरोजगार संस्था, सेवा, दिव्यांग, महिला संस्था व महिला बचत गटाकडून करण्यात येत असून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फतही झोपडपट्टयांमधून घराघरातून कचरा जमा केला जात आहे. या परिसरातील जागा, ड्रेनेज व शौचालय, स्वच्छतागृह, जाळी साफसफाई अशी कामे या विभागामार्फत करण्यात येतात.

या स्वच्छतेसाठी  कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आल्यास  बेरोजगार, सेवा, दिव्यांग व महिला आणि महिला बचत गट अशा सुमारे २ ते अडीच हजार संस्था बंद पडून सुमारे ७५ हजार कामगारांमध्ये बेरोजगारी होणार अशी शंका उपस्थित केल्याने टेंडर स्थगित करण्यात येणार असून सध्या सुरू असलेल्या पध्दतीने काम सुरू राहणार असलेल्याचेही सामंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य राजहंस सिंह, सचिन अहिर यांनी सहभाग घेतला.