GEM  Tendernama
मुंबई

'GEM'ची गरुडभरारी; 5 वर्षात गाठला 2 लाख कोटींचा पल्ला

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये गव्हर्मेंट ई मार्केटप्लेस (जीईएम) या केंद्र सरकारी पोर्टलवरून झालेल्या वस्तू आणि सेवांच्या खरेदीने दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी नुकतीच ही माहिती दिली. भारताने या आर्थिक वर्षात एकूण ७५० अब्ज डॉलर मूल्याच्या साहित्याच्या निर्यातीचा टप्पा ओलांडला आहे. अंतिम आकडा ७६५ अब्ज डॉलरच्यापुढे जाण्याची अपेक्षा आहे, असेही गोयल म्हणाले.

या पोर्टलची सुरुवात २०१७ मध्ये झाल्यावर त्यावर्षी तेथे सुमारे चारशे कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. दुसऱ्या वर्षी त्याने पाच हजार आठशे कोटी रुपयांचा टप्पा गाठल्यावर दोन वर्षांपूर्वी त्यावरील व्यवसाय पस्तीस हजार कोटी रुपयांपर्यंत वाढला. गेल्या वर्षी तो तिपटीने वाढून एक लाख सहा हजार कोटी रुपयांवर पोहोचला. पाच वर्षांत दोन लाख कोटी रुपयांपर्यंत व्यवसाय वाढल्याने हा प्रयोग यशस्वी झाल्याचे दिसत असल्याचे गोयल म्हणाले.

या वर्षअखेरीस म्हणजे ३१ मार्च २०२३ पर्यंत जीईएमवरील व्यवहारांनी दोन लाख कोटी रुपये सकल व्यापारी मूल्य दाखवले आहे; तर स्थापनेपासून जीईएमवर एकूण ३.९ लाख कोटी रुपये व्यापारी मूल्याचे व्यवहार झाले. यावर ६७ हजार सरकारी खरेदीदारांनी केलेल्या व्यवहारांची संख्या १.४७ कोटी एवढी होती. या पोर्टलवर साडेअकरा हजारपेक्षा जास्त वर्गांमध्ये ३२ लाखांहून जास्त उत्पादने आणि २८० पेक्षा जास्त सेवा वर्गांमध्ये २.८ लाख पेक्षा जास्त सेवांचा समावेश आहे. या व्यासपीठामुळे किमान दहा टक्के बचत होत असून ही रक्कम चाळीस हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त असल्याचे सांगण्यात आले.

जीईएम म्हणजे काय?
जीईएम ही सार्वजनिक खरेदीसाठी सुरू झालेली ऑनलाईन व्यवस्था आहे. थेट खरेदी, पहिल्या स्तरावरील खरेदी-विक्री, टेंडर, रिव्हर्स ऑक्शन, रिव्हर्स ऑक्शननंतर टेंडर आदी खरेदी-विक्रीविषयक विविध पद्धतींचा जीईएम व्यवस्थेवर समावेश केला आहे. संपर्करहित, कागदरहित आणि रोखरहित व्यवहारांसाठी जीईएम ही विश्वासार्ह व्यवस्था आहे. व्यवहारकर्त्यांची खातरजमा त्यांच्या आधार, पॅन, स्टार्टअप, जीएसटीएन, क्रमांक आदींमार्फत तपासली जाते.