Nitin Gadkari Tendernama
मुंबई

नागपूर-पुणे ८ तासात सुपरफास्ट; असा आहे नितीन गडकरींचा मास्टरप्लॅन

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नागपूर-मुंबई (Nagpur-Mumbai) समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगरजवळ प्रस्तावित पुणे-संभाजीनगर (औरंगाबाद) एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस-वे नी जोडण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. त्यामुळे पुणे-छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रवास अडीच तासांत आणि समृद्धी महामार्गाद्वारे नागपूर-छत्रपती संभाजीनगर प्रवास साडेपाच तासांत करता येणे शक्य होणार असल्याचे गडकरी यांनी म्हटले आहे.

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या कार्यकाळात या महत्वाकांक्षी प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली होती. राज्यात सत्तापालट होऊन फडणवीस - शिंदे सरकार सत्तेत येताच त्यांनी या प्रकल्पाला गती दिली आहे. मुंबई आणि नागपूर यांना जोडणाऱ्या या महामार्गाचा पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होत आले आहे. अनेक अर्थांनी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरणार आहे. "सद्यस्थितीत नागपूर ते पुणे हा प्रवास करताना प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाला छत्रपती संभाजीनगरजवळ नवीन प्रस्तावित पुणे-संभाजीनगर (औरंगाबाद) एक्सेस कंट्रोल ग्रीन एक्सप्रेस-वे नी जोडण्यात येईल" असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

तसेच नागपूर ते छत्रपती संभाजीनगर या पहिल्या टप्प्यात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून हा मार्ग बनविला जाणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे. हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे संपूर्ण नवीन अलाईंमेंट घेऊन तयार करण्यात येईल, यामुळे पुणे - छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) प्रवास अडीच तासांत आणि समृद्धी महामार्गाद्वारे नागपूर - छत्रपती संभाजीनगर प्रवास साडेपाच तासांत करता येणे शक्य होणार असल्याचे सुद्धा गडकरी यांनी म्हटले आहे. सध्या या महामार्गाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे, त्यामुळे लवकरच हा महामार्ग प्रवाशांच्या सेवेत येईल अशी अपेक्षा आहे.