Mumbai-Delhi Express way Tendernama
मुंबई

Express way : दिल्ली-मुंबई ई-वेच्या पहिल्या टप्प्याचा ठरला मुहूर्त

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : दिल्ली (Delhi) ते आर्थिक राजधानी मुंबई (Mumbai) हा रस्त्याने 24 तासांचा प्रवास आहे, जो येत्या काही दिवसांत निम्म्यावर येईल. दिल्ली ते मुंबई हा प्रवास अवघ्या 12 तासात पूर्ण करता येईल. सध्या संपूर्ण स्ट्रेचची तयारी सुरू आहे, त्यापैकी पहिल्या टप्प्याचे उद्घाटन होणार आहे. हरियाणातील सोहना ते दिल्लीजवळील राजस्थानमधील दौसा या पहिल्या सेक्शनचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 12 फेब्रुवारीला उद्घाटन होणार आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.

गेल्या काही वर्षांत यमुना द्रुतगती मार्ग, पूर्वांचल द्रुतगती मार्ग, बुंदेलखंड द्रुतगती मार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग असे महत्त्वाचे मार्ग तयार करण्यात आले आहेत. याशिवाय यूपीमध्ये गंगा एक्सप्रेस वेवरही काम सुरू आहे. या भागातील सर्वात मोठा एक्स्प्रेस वे मुंबई आणि दिल्लीला जोडणार आहे, जो नितीन गडकरींचा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प मानला जात आहे. 1,390 किमी एक्स्प्रेस वे दिल्ली ते मुंबई दरम्यानचा प्रवास अर्धा करेल. अंतर आणि वेळ कमी करण्याबरोबरच हा संपूर्ण मार्ग सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल.

हा एक्सप्रेसवे भारतमाला प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यांतर्गत बांधला जात आहे, ज्या अंतर्गत देशभरात महामार्गांचे जाळे तयार केले जात आहे. भारतमाला परियोजनेअंतर्गत महत्त्वाची शहरे जोडणे, सीमावर्ती भागात रस्त्यांचे जाळे निर्माण करणे आणि दुर्गम भागात पायाभूत सुविधा मजबूत करणे यावर भर दिला जात आहे. भारतमालाच्या पहिल्या टप्प्यात एकूण 24,800 किमीचे महामार्ग बांधले जाणार आहेत. या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग म्हणजे दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग. त्यामुळे दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरातलाही जोडता येणार आहे.

सुरुवातीच्या टप्प्यात एकूण 8 लेनचा एक्स्प्रेस वे तयार केला जाईल, जो 12 लेनपर्यंत वाढवता येईल. या एक्स्प्रेस वेच्या माध्यमातून आर्थिक वाढही शक्य होणार आहे. हा मार्ग राजस्थान, गुजरात आणि हरियाणातील अनेक शहरांची कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होईल. सोहना ते दौसा या एक्स्प्रेस वेचा पहिला भाग 12 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. याशिवाय वडोदरा ते अंकलेश्वर हा भागही लवकरच पूर्ण होणार आहे. एवढेच नाही तर अमृतसर ते जामनगरला जोडणाऱ्या कॉरिडॉरचे कामही वेगाने सुरू आहे. अंबाला ते कोतपुतलीपर्यंतचे कामही पूर्णत्वास आले आहे.