मुंबई (Mumbai) : महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यातील पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी या दरम्यान होणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचे काम संबंधित शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्याचसोबत स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा, समजून घेऊन त्यानंतरच पुढे न्यावे, असे मुख्यमंत्री यांचे निर्देश असून जनभावनेचा आदर करुनच कार्यवाही करण्यात येईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे (Dadaji Bhise) यांनी विधानपरिषदेत सांगितले.
राज्यात नव्याने शक्तीपीठ महामार्ग बांधण्यात येणार आहे, यासंदर्भात सदस्य सतेज पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री भुसे बोलत होते. भुसे यांनी सांगितले की हा महामार्ग महत्वपूर्ण असून लोकप्रतिनिधी तसेच स्थानिकांना विश्वासात घेऊन पुढील कार्यवाही केली जाईल. महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यांमधून जात असून पुढे गोवा राज्यामध्ये प्रवेश करणार आहे. १२ जिल्ह्यांमधील विविध देवस्थाने, संताची कर्मभूमी असलेले मराठीचे आद्यकवी अंबाजोगाई स्थित मुकुंदराज स्वामी, जोगाई देवी तसेच औंढ नागनाथ व परळी वैद्यनाथ येथील २ ज्योर्तिलिंग व महाराष्ट्राचे आराध्यदैवत पंढरपुर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही जोडले जाणार आहेत. तसेच कारंजा (लाड), माहूर, अक्कलकोट,गाणगापुर, नरसोबाची वाडी, औदुंबर ही दत्त गुरुची धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत.
या महामार्गामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल व इतर सर्व दळण-वळण कमी वेळेत होईल. वर्धा ते सिंधूदुर्ग हा प्रवास सध्या १८ तासांत होतो तो या महामार्गामुळे अवघ्या आठ तासात शक्य होणार आहे. यामुळे वेळेची, इंधनाची बचत होईल व महामार्ग परिसराचा विकास होण्यास मदत होईल, अशी माहिती मंत्री भुसे यांनी यावेळी दिली. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुढील आठवड्यात याबाबत सदस्यांसोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री यांनी बैठक घ्यावी, असे सूचित केले. या लक्षवेधीत सदस्य शशिकांत शिंदे, भाई जगताप आदी सदस्यांनी सहभाग घेतला.