chandrakant patil Tendernama
मुंबई

Mumbai : आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयासाठी आचारसंहितेनंतर 400 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईत स्वरसम्राजी, भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाची उभारणी करण्यासाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्चाचे टेंडर निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यानंतर लगेचच शास्त्रीय संगीताचे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे केंद्र कलिना कॅम्पस परिसरामध्ये सुरू होईल, अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच दिली.

सुप्रसिद्ध गायिका आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने प्रस्तावित आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालयासाठी, राज्य सरकारने मुंबई विद्यापीठाच्या सांताक्रूझच्या कलिना कॅम्पसमध्ये 7,000 चौरस मीटरचा भूखंड दिला आहे. ग्रंथालय संचालनालयाकडे कालिना कॅम्पसमध्ये मध्यवर्ती ग्रंथालय उभारण्यासाठी 16,188 चौरस मीटरचा भूखंड असून, त्यापैकी 7 हजार चौरस मीटर इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक अँड म्युझियमसाठी देण्यात येणार आहे.

राज्य सरकारला हृदयनाथ मंगेशकर (लता मंगेशकर यांचे भाऊ) यांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, ज्याद्वारे शासनाला आंतरराष्ट्रीय महाविद्यालयाची संकल्पना समजेल. इंटरनॅशनल कॉलेज ऑफ म्युझिक हे मंगेशकर कुटुंबियांच्या संकल्पनेवर आधारित आहे, ज्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत उषा मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर, झाकीर हुसेन, ए आर रहमान, सुरेश वाडकर यांचा समावेश आहे. राज्य सरकारने या शैक्षणिक वर्षात संगीत महाविद्यालय सुरू करण्याचे नियोजन केले आहे. यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतरत्न दिवंगत लता मंगेशकर यांच्या स्मृतिनिमित्त सुरु करण्यात येणारे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय हे 28 सप्टेंबर रोजी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच हे आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आहे. तेवढेच दर्जेदार महाविद्यालय असले पाहिजे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.