मुंबई (Mumbai) : महाविकास आघाडीचे सरकार राज्यात सत्तेत झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) क्षेत्रातील नागरी सुविधांची कामे जलद गतीने मार्गी लागून स्थानिकांच्या अडचणी दूर होण्यासाठी स्वतंत्र कॅबिनेट मंत्रीपदाची निर्मिती आणि नेमणूक करावी, अशी विनंती समाजवादी व महाविकास आघाडीचे ‘भिवंडी पूर्व’चे उमेदवार व स्थानिक आमदार रईस शेख यांनी मविआच्या प्रमुख नेत्यांकडे केली आहे.
यासंदर्भात बोलताना आमदार रईस शेख म्हणाले की, लोकसंख्येची सर्वाधिक घनता व झपाट्याने विकसीत होत असलेले क्षेत्र म्हणून मुंबई महानगर प्रदेश ओळखला जातो. या प्रदेशात ९ महानगरपालिका, ९ नगरपरिषदा, एक नगरपंचायत आणि पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील १४६५ गावे समाविष्ट आहेत. या परिसरातील लोकसंख्या २ कोटी ३५ लाख असून प्रदेशचे क्षेत्र ६३२८ चौ. कि. मी. आहे. या क्षेत्रात मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरण (एमएमआरडीए) असले तरी त्याचा भर पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर आहे. येथील स्थानिक स्वराज्य संस्था व प्राधिकरणांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे या प्रदेशाचा त्याच्या क्षमतेनुसार विकास होऊ शकला नाही. परिणामी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्य मंद गतीने होत असून त्याचा फटका नागरिकांच्या मूलभूत सोयी -सुविधांना बसत असल्याचे आमदार रईस शेख यांनी म्हटले आहे.
आमदार रईस शेख यांनी पत्रात म्हटले आहे की, भिवंडी हे लॉजिस्टिक्स आणि वेअरहाऊस हब आहे. लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित होईल. परिसरात जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट असून वाढवण बंदर पालघर जिल्ह्यात होत आहे. समृद्धी महामार्ग, विरार-अलीबाग मल्टीमॉडाल कॉरिडोर, सागरी महामार्ग, रेल्वे नेटवर्क यामुळे ‘एमएमआर’ मध्ये दळणवळणाचे जाळे निर्माण होत आहे. परिसरातील प्रकल्प विविध प्राधिकरणाकडून राबवले जातात. येथील प्राधिकरणे व परिसरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे ‘एमएमआर’साठी स्वतंत्र मंत्री असणारा विभाग निर्माण करावा, अशी विनंती आमदार व मविआ उमेदवार रईस शेख यांनी केली आहे.