mumbai  Tendernama
मुंबई

MHADA : गोरेगावातील म्हाडाच्या तारांकित घरांच्या किमती किती असणार?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : परवडणारी घरे बांधण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या म्हाडातर्फे (MHADA) गोरेगावच्या प्रेमनगर येथे 39 मजली टॉवर उभारण्याचे काम सध्या वेगाने सुरू असून, आतापर्यंत या टॉवरच्या 29 मजल्यांचे काम पूर्ण झाले आहे. म्हाडाने खासगी विकासकांना टक्कर देत स्वीमिंग पूल, क्लब हाऊस, पोडियम पार्किंग अशा सुविधा असणाऱ्या तारांकित घरांचा पहिलाच प्रकल्प उभारला असल्याने याबाबत मुंबईकरांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

मार्च 2025 पर्यंत हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे म्हाडाचे टार्गेट होते. कामाचा वेग पाहता वर्षअखेरीस टॉवरचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार महिन्यांत ज्या इमारतीला ओसी मिळू शकेल. तेथील घरांचा समावेश जून-जुलैतील लॉटरीमध्ये समाविष्ट करण्याचा हालचाली म्हाडाने सुरू केल्या आहेत.

त्यामुळे या आलिशान घरांसाठी आता फार काळ प्रतीक्षा करावी लागणार नाही. याठिकाणी मध्यम उत्पन्न गटासाठी 227, तर उच्च उत्पन्न गटासाठी 105 घरे आहेत. उच्च उत्पन्न गटातील घरे 979 चौरस फुटांची तर मध्यम उत्पन्न गटातील घरे 794 चौरस फुटांची आहेत.

गोरेगावातील म्हाडाच्या तारांकित घरांच्या किमती काय असणार याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. अनेक सुखसोयींनी सुसज्ज असलेल्या म्हाडाच्या या घरांची स्पर्धा थेट खासगी विकासकांसोबत असली तरी त्यांच्या तुलनेत म्हाडाच्या या घरांच्या किमती नक्कीच कमी असतील.

लवकरच प्राधिकरणाच्या बैठकीत या घरांच्या किमती ठरवल्या जातील, अशी माहिती म्हाडातील उच्चपदस्थांनी दिली. तसेच या 'ड्रीम प्रोजेक्ट'ला उच्च आणि मध्यम गटातील अर्जदारांकडून कसा प्रतिसाद मिळतो यावर पुन्हा अशा तारांकित घरांची निर्मिती करायची की नाही, याबाबतचा निर्णय प्राधिकरण घेणार आहे.