मुंबई (Mumbai) : सुमारे ३९ एकरांवर पसरलेल्या कामाठीपुराच्या पुनर्विकासाचा आराखडा महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला पाठवला होता. या प्रकल्पाला सरकारची मंजुरी मिळाली असून म्हाडा येत्या काही दिवसांत प्रकल्पाचे काम सुरू करणार आहे. लवकरच टेंडर प्रसिद्ध केले जाणार आहे. आगामी तीन ते चार महिन्यांत प्रकल्पाचे काम सुरू करण्याचे म्हाडाचे नियोजन आहे.
कामाठीपुरा पुनर्विकास योजनेंतर्गत सरकारने दोन प्रकारच्या इमारती बांधण्याचे नियोजन केले आहे. कॅम्पसमध्ये सुविधांसह एकूण १८ इमारती बांधण्याची योजना आहे. यामध्ये ५८ मजल्यांच्या १० इमारती, तर ७८ मजल्यांच्या ८ इमारती बांधल्या जाणार आहेत. प्रकल्पासाठी खर्च केलेली रक्कम ७८ मजली इमारतींमधून वसूल केली जाणार आहे. म्हाडा ७८ मजली इमारतींमधील सदनिका विकणार आहे. ५८ मजल्यांच्या १० इमारतींमध्ये स्थानिक लोकांची वस्ती करण्यात येणार आहे. ३९ एकरच्या या संकुलात सुमारे ४७५ उपकर इमारती, १६३ इतर इमारती, १५ धार्मिक स्थळे, २ शाळा आणि ४ सरकारी कार्यालये आहेत. संकुलातील सुमारे ५२ इमारती कोसळल्या आहेत. पुनर्विकास प्रकल्पांतर्गत, तेथे राहणाऱ्या सर्व पात्र नागरिकांना किमान ५०० चौरस फुटांचे घर मोफत देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
या योजनेंतर्गत ५० मीटरपर्यंतच्या जमीन मालकांना ५०० चौरस फुटांचे १ घर, ५१ मीटर ते १०० मीटरपर्यंतच्या जमीन मालकांना ५०० चौरस फुटांची २ घरे, १०१ मीटर ते १५० मीटरपर्यंतच्या जमीन मालकांना ५०० चौरस फुटांची ३ घरे दिली जाणार आहेत. तर १५१ मीटर ते २०० मीटरपर्यंत प्रत्येकी ५०० चौरस फुटांची ४ घरे जमीन मालकाला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकल्पातून म्हाडाला सुमारे १५०० ते १८०० घरे विक्रीसाठी मिळतील. त्यांच्या विक्रीतून म्हाडाला सुमारे १ हजार कोटींहून अधिक उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.