मुंबई (Mumbai) : म्हाडाच्या (Mhada) मुंबई मंडळाने वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील सहा इमारतींच्या बांधकामाला सुरुवात केली आहे. या पुनर्वसन इमारतींमध्ये प्रत्येकी ५०० चौरस फुटांची १७०० घरे बांधली जाणार आहेत. इमारतींचे बांधकाम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होईल असा दावा म्हाडाने केला आहे.
मुंबई मंडळाच्यावतीने ना.म. जोशी मार्ग, नायगाव आणि वरळीतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास करीत आहे. या प्रकल्पाचे भूमीपूजन २०१७ मध्ये करण्यात आले होते. मात्र विविध कारणांमुळे २०२१ पर्यंत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकली नाही. ऑगस्ट २०२१ मध्ये पुन्हा भूमिपूजन करून वरळीतील पुनर्विकासाच्या कामास सुरुवात करण्यात आली. पुढील ३६ महिन्यांत घराचा ताबा देण्यात येईल, आधीच्या नियोजनानूसार २०२४ अखेरीस इमारतींचे बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र या प्रकल्पातील इमारतींचे बांधकाम डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
सध्या वरळीमध्ये सहा इमारतींचे बांधकाम सुरू आहे. या सहा पुनर्वसन इमारतींमध्ये ५०० चौरस फुटांच्या १७०० घरांचा समावेश आहे. यापैकी एका इमारतीमधील तीन मजल्याचे आरसीसी काम, तर दोन इमारतींच्या पायाचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित तीन इमारतींच्या बांधकामासही आता सुरुवात झाली आहे. इमारतींचे बांधकाम पुढील ३६ महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. या सहा इमारतींचे काम सुरू असतानाच दुसरीकडे टप्प्याटप्प्याने अन्य इमारती पाडून तेथे नव्या इमारतींच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे.
बीडीडी पुवर्वसन प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील ना. म जोशी मार्ग येथील रहिवाशी स्थलांतरित न झाल्याने प्रकल्प रखडला होता. सध्या येथील रहिवाश्यांवर ९५ अ ची कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे येत्या आठवड्यात येथील सर्व रहिवाशी स्थलांतरीत होतील, त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. मात्र, येथील रहिवाशी अद्यापही नाराज आहेत. म्हाडाची यंत्रणा राजकीय नेत्यांच्या तालावर नाचत असल्याने हा प्रकल्प पूर्णत्वास जाईल याची खात्री वाटत नसल्याचे बीडीडी चाळ पुनर्वसन समितीचे सरचिटणीस तानाजी केसरकर यांनी सांगितले.