MHADA Tendernama
मुंबई

Mumbai : 'त्या' 734 इमारतींच्या पुर्नविकासासाठी म्हाडा मिशन मोडवर; लवकरच टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : दक्षिण मुंबईतल्या कामाठीपुरा परिसराच्या पुनर्विकासासाठी म्हाडाने वेगवान हालचाली सुरू केल्या आहेत. सध्या प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानंतर साधारण २ ते ३ महिन्यात प्रत्यक्ष बांधकामासाठी टेंडर काढले जाणार आहे. कामाठीपुरा परिसरात जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकर प्राप्त अशा सुमारे ७३४ इमारती आहेत.

राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीने कामाठीपुरा पुनर्विकासाच्या व्यवहार्यता अहवालास मान्यता दिली आहे. त्यानुसार प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार केला जाणार आहे. यासाठी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यात येईल. आगामी दोन महिन्यांत सल्लागाराकडून सविस्तर प्रकल्प आराखडा सादर होईल, त्यास राज्य सरकारची मंजुरी घेतली जाईल. त्यानंतरच बांधकामासाठी टेंडर काढले जाईल. कामाठीपुरा पुनर्विकास प्रकल्पाचा सविस्तर आराखडा सादर करताना परिसराचा संपूर्ण अभ्यास केला जाईल.

परिसरात जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकर प्राप्त अशा सुमारे ७३४ इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे ६ हजार ७३ निवासी आणि १ हजार ३४२ अनिवासी गाळे आहेत. या इमारती १०० वर्षांपेक्षा जुन्या असून, त्यामध्ये ३४९ बिगर उपकरप्राप्त इमारतींचा समावेश आहे. यात १४ धार्मिक वास्तू, दोन शाळा, चार आरक्षित भूखंड आहेत. शिवाय म्हाडाने बांधलेल्या ११ पुनर्रचित इमारती आहेत. सरकारी, निमसरकारी कार्यालयांसह सर्वच बांधकामांचा म्हणजे क्षेत्रफळाचा अभ्यास केला जाईल. दोन एक महिन्यांच्या कालावधीत ही प्रक्रिया पार पडली की, प्रत्यक्षात बांधकामासाठी टेंडर काढले जाईल. सविस्तर प्रकल्प अहवाल आल्यानंतर टेंडरसंदर्भात निर्णय घेतला जाईल.