MHADA Tendernama
मुंबई

मुंबईत 'त्या' आठ एकर भूखंडावर म्हाडा बांधणार कमर्शियल कॉम्प्लेक्स

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : वांद्रे पश्चिम द्रुतगती मार्गालगत (Western Express Highway) नव्याने आढळलेल्या आठ एकर भूखंडावर व्यावसायिक संकुल उभारण्याचा निर्णय म्हाडाच्या (MHADA) मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराची नियुक्ती करण्याची टेंडर प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. त्यानंतर प्रकल्पाची व्यवहार्यता तपासून प्रत्यक्ष कामासाठी टेंडर काढण्यात येणार आहे.दो

वांद्रे पश्चिम येथील एस. व्ही. रोड आणि पश्चिम द्रुतगती मार्ग यांना जोडणाऱ्या चौकापासून ते वांद्रे पूर्व येथील प्रकाशगड कार्यालयापर्यंतची आठ एकर जागा मुंबई मंडळाची असून मोक्याच्या आणि इतक्या मोठ्या जागेबाबत मुंबई मंडळ अनभिज्ञ होते. मंडळाने आता ही जागा ताब्यात घेतली असून ही जागा व्यावसायिक वापरासाठी आरक्षित आहे. त्यामुळे या जागेवर व्यावसायिक संकुल उभारण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.

मुंबई मंडळाचा बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू असून यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची गरज आहे. या प्रकल्पासाठी येणारा खर्च भरून काढण्यासाठी, तसेच भविष्यात प्रकल्प मार्गी लावण्यासाठी येथे व्यावसायिक संकुल बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी योगेश म्हसे यांनी दिली. आठ एकर जागेवर व्यावसायिक संकुल बांधण्यासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्यात येणार असून, त्यासाठी लवकरच टेंडर काढण्यात येणार असल्याचेही म्हसे यांनी सांगितले.

आठ एकर जागेवर व्यवसायिक संकुल बांधणे व्यवहार्य आहे का, याचा अभ्यास करण्याची जबाबदारी सल्लागारावर सोपविण्यात येण्यात येणार आहे. या भूखंडावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे असून, ती हटवून रहिवाशांचे पुनर्वसन करणे ही दोन मोठी आव्हाने मंडळासमोर आहेत. त्यामुळे या जागेवर एकूण किती अतिक्रमणे आहेत, किती जागा मोकळी आहे, रहिवाशांचे पुनर्वसन कसे करता येईल, या सर्व बाबींचा अभ्यासही या सल्लागाराला करावा लागणार आहे. सल्लागाराचा यासंबंधीचा अहवाल आल्यानंतर आणि प्रकल्प व्यवहार्य ठरल्यानंतर प्रत्यक्ष कामासाठी टेंडर काढण्यात येणार आहेत.