mhada Tendernama
मुंबई

MHADA : म्हाडाची मुंबईत 'या' ठिकाणी अडीच हजार घरांची योजना; दीड हजार गृहनिर्मितीसाठी लवकरच Tender

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : म्हाडाकडून (MHADA) गोरेगाव येथे आणखी अडीच हजार घरे बांधली जाणार आहेत. पत्राचाळ पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडांवर अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी ही घरे बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे.

म्हाडाच्या या गृहप्रकल्पाची निर्मिती दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील 1 हजार 500 घरांच्या प्रकल्पासाठी लवकरच टेंडर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. गोरेगाव, पहाडी येथे अडीच हजारांहून अधिक घरांची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती म्हाडाकडून देण्यात आली आहे. म्हाडाचे मुंबई मंडळ गोरेगावमध्ये लवकरच नवा गृहप्रकल्प हाती घेणार आहे.

गोरेगाव पश्चिम येथील सिद्धार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकासाअंतर्गत उपलब्ध झालेल्या भूखंडांवर 2 हजार 500 घरे बांधण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम गटासाठी ही घरे असणार आहेत.

म्हाडाच्या घरांची निर्मिती दोन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील 1 हजार 500 घरांच्या कामांसाठी टेंडर काढण्याची तयारी मुंबई मंडळाने सुरू केली आहे. पत्राचाळ म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासातून मुंबई मंडळाला आपल्या हिश्श्यातील 2 हजार 700 घरे सोडतीसाठी विकासकाकडून उपलब्ध होणार होती.

मात्र विकासकाने पुनर्विकास अर्धवट सोडल्याने प्रकल्प रखडला. तर दुसरीकडे प्रकल्पात आर्थिक गैरव्यवहार केला. प्रकल्प वादात अडकला आणि शेवटी राज्य सरकारने विकासकाकडून प्रकल्प काढून घेत म्हाडाकडे सोपवला.

विकासकाने म्हाडाच्या हिश्श्यातील 306 घरांचे काम सुरू केले आहे. मात्र, ते अर्धवट सोडले. या अर्धवट घरांसाठीच मंडळाने 2016 मध्ये सोडत काढली होती. एकूणच प्रकल्प ताब्यात आल्यानंतर मुंबई मंडळाने मूळ रहिवाशांच्या 672 घरांसह सोडतीतील घरे पूर्ण करण्याचे काम 2022 मध्ये हाती घेतले आहे. सध्या हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. असे असताना देखील मंडळाने आपल्या हिश्श्यातील 2 हजार 500 घरांची बांधणी करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली आहे.

पहिल्या टप्प्यातील 1 हजार 500 घरांच्या बांधकामासाठी टेंडर काढण्याची तयारी सुरू आहे. येत्या काही दिवसांतच टेंडर प्रसिद्ध केले जाईल, असेही जयस्वाल यांनी सांगितले.