Mhada Tendernama
मुंबई

Mumbai : विधानसभा निवडणुकीआधी म्हाडाची 'एवढ्या' घरांसाठी बंपर सोडत

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : म्हाडाच्या मुंबई विभागातील घरांच्या सोडतीची जाहिरात पुढील आठवड्यात प्रसिद्ध होणार आहे. दोन हजार घरांसाठी सोडत काढण्याची प्रक्रिया जवळपास पूर्ण झाली आहे. यात दिंडोशी, गोरेगाव, विक्रोळी आणि अँटॉप हिल येथील घरांचा समावेश आहे.

जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून नागरिक सोडतीसाठी अर्ज करू शकतील. मुंबई मंडळाची शेवटची सोडत गेल्या वर्षी काढण्यात आली होती. 2023 मध्ये जाहीर झालेल्या 4,082 घरांच्या सोडतीसाठी 1,00,935 जणांनी नोंदणी केली. अर्जदारांच्या संख्येपेक्षा घरांची संख्या कमी असल्याने मागील सोडतीत हजारो अर्जदारांची निराशा झाली. निराश अर्जदार 2024 च्या लॉटरीमध्ये त्यांचे नशीब पुन्हा आजमावू शकतात. सोडतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया या महिन्यात सुरू होईल, तर सोडतीचा निकाल सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल. सोडतीत सहभागी होण्यासाठी अर्जदारांकडे 7 कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. सोडतीची तारीख जाहीर होण्यापूर्वी, आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्जदारांना आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, प्रतिज्ञापत्र, जात प्रमाणपत्र आणि संबंधित प्रवर्गाचे प्रमाणपत्र तयार ठेवणे गरजेचे आहे.

2023 पासून म्हाडाने सोडतीची संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन केली आहे. यामुळे, जे अर्जदार पहिल्यांदाच सोडतीत सहभागी होण्याचा विचार करत आहेत, त्यांना म्हाडाची जाहिरात प्रसिद्ध होण्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही. सोडत निघण्यापूर्वीच अर्जदार म्हाडाच्या वेबसाईटद्वारे ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. त्याच वेळी, नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेल्या अर्जदारांनी घर निवडून आणि जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ठेवीची रक्कम जमा करणे आवश्यक आहे. चालू वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. सप्टेंबरअखेर राज्यात आचारसंहिता लागू होऊ शकते. आचारसंहितेचे निर्बंध लागू होण्यापूर्वी लोकप्रिय योजना सरकारला तडीस न्यायच्या आहेत. त्यामुळे नवीन प्रकल्प सुरू करण्यावर आणि पूर्ण झालेल्या प्रकल्पांवर सरकारचा कटाक्ष आहे. सरकारचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी म्हाडानेही कंबर कसली आहे. त्याअंतर्गत निवडणुकीपूर्वी मुंबईतील घरांची सोडत काढण्याची तयारी म्हाडाने केली आहे.