MHADA Tendernama
मुंबई

मुंबईकरांनो घर घेण्यासाठी व्हा सज्ज!; म्हाडाची 3500 घरांसाठी लॉटरी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : म्हाडाने (MHADA) राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पातील घरांसाठी 'आयएचएलएमएस २.०' (इंटिग्रेटेड हाउसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम) ही नवीन संगणकीय प्रणाली तयार केली आहे. मुंबईत याच प्रणालीद्वारे म्हाडातर्फे फेब्रुवारी महिन्यात ३,५०० घरांची सोडत काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे घरांच्या सोडतीतील विजेत्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घरांचा ताबा देण्याचा म्हाडाचा प्रयत्न आहे. म्हाडाच्या या घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे.

घराच्या लॉटरीची ही प्रक्रिया सुलभ व्हावी यासाठी म्हाडाने पुढाकार घेतला आहे. तसेच नेहमीप्रमाणे प्रक्रिया न राबवता यावेळी लॉटरीच्या प्रक्रियेत काही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता अर्ज करणं खूप सोपं झालं आहे. यासाठी म्हाडाने मोबाइल अॅप तयार केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून लोकांना घरबसल्या कम्प्युटर किंवा लॅपटॉप तसेच मोबाइलवरून अर्ज करता येणार. तसेच या नवीन प्रणालीच्या साह्याने घरांच्या सोडतीसाठी अर्ज दाखल करण्यासह ते सोडत विजेत्यांना घरांचा ताबा मिळेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. त्यामुळे सोडतीसाठी इच्छुक असलेल्यांसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. मुंबईत याच प्रणालीच्या साह्याने फेब्रुवारीमध्ये ३,५०० घरांची सोडत काढण्यात येणार आहे. विशेष म्हणजे घरांच्या सोडतीतील विजेत्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत घरांचा ताबा देण्याचे म्हाडा प्रयत्न करत आहे.

म्हाडाने राज्यातील गृहनिर्माण प्रकल्पातील घरांसाठी 'आयएचएलएमएस २.०' (इंटिग्रेटेड हाउसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टीम) ही नवीन संगणकीय प्रणाली तयार केली आहे. म्हाडाच्या आयटी विभागाने त्यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला असून त्या अनुषंगाने ही संपूर्ण प्रक्रिया घेतली जाणार आहे. स्वयंचलित ब्लॉकचेन प्रणालीमध्ये सोडतीसाठी डिजिटल माध्यमातून देण्यात आलेली माहिती, कागदपत्रे कायमस्वरूपी जतन होणार आहेत. या नोंदणी प्रक्रियेत अर्जदारास एक स्वतंत्र क्रमांक मिळणार असून त्याद्वारे अर्जदाराची माहिती प्रणालीमध्ये कायम सुरक्षित राहणार आहे.

सध्याच्या सोडतीत एखादा अर्जदार विजेता ठरल्यानंतर त्याची पात्रता निश्चित केली जात होती. नवीन प्रणालीमध्ये ही पद्धत बदलताना नोंदणी प्रक्रियेत म्हाडाच्या निकषानुसार सर्व कागदपत्रांची पूर्तता केलेले अर्जदार घरांच्या सोडत प्रक्रियेत पात्र ठरण्याची सुधारणा केली आहे. या पद्धतीने सोडतीपूर्वीच अर्जदारांची पात्रता निश्चित होणार आहे. त्यानुसार पात्र ठरलेल्या अर्जदारांनाच सोडतीत सहभागी होण्याचा मार्ग मिळणार आहे.