मुंबई (Mumbai) : म्हाडाच्या मुंबई मंडळाने दक्षिण मुंबईत ताडदेव येथे नोकरदार महिलांसाठी म्हाडाचे पहिले भव्य वसतिगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. २००० चौरस मीटर जागेवर प्रस्तावित २२ मजली वसतिगृहासाठी ८० कोटी रुपये खर्चाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर राज्य सरकारच्या मान्यतेने ही टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे.
सामाजिक बांधिलकी म्हणून म्हाडाने विद्यार्थी आणि नोकरदार महिलांकरीता वसतिगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मुंबई मंडळाकडून काळाचौकी येथील जिजामाता नगरमध्ये विद्यार्थ्यांसाठी २२ मजली, तर मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाने ताडदेव येथील एम.पी. मिल कम्पाउंड परिसरातील २००० चौरस मीटर जागेवर नोकरदार महिलांसाठी २२ मजली वसतीगृह बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई मंडळाने विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची टेंडर प्रक्रिया अंतिम करून २०२२ मध्ये बांधकामाला सुरुवात केली. हे काम सध्या सुरू आहे. मात्र दुसरीकडे दुरुस्ती मंडळाकडून ताडदेवमधील वसतिगृह २०२१ पासून रखडलेले आहे. आता दुरूस्ती मंडळाने या कामाला गती दिली असून नोकरदार महिलांसाठीच्या म्हाडाच्या पहिल्या वसतिगृहाचा आराखडा तयार करून अंतिम करण्यात आला आहे.
या वसतिगृहाचा प्रस्ताव लवकरच प्रशासकीय मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. सरकारची मान्यता मिळाल्यानंतर वसतिगृहाच्या कामासाठी टेंडर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. टेंडर प्रक्रिया अंतिम करून २०२५ मध्ये प्रत्यक्षात या वसतिगृहाच्या कामाला सुरुवात करण्याचे दुरूस्ती मंडळाचे नियोजन आहे. मंत्रालय, चर्चगेट, मुंबई सेंट्रल, महालक्ष्मी अशा परिसरात काम करणाऱ्या महिलांना त्याचा फायदा होईल. ताडदेव पोलीस स्थानकालगतच्या एम.पी.मिल कम्पाउंड परिसरातील संक्रमण शिबिराच्या जागेवर हे वसतिगृह बांधण्यात येणार आहे. एम.पी.मिल कम्पाउंड परिसरात दुरूस्ती मंडळाच्या संक्रमण शिबिराच्या एकूण सात इमारती आहेत. या इमारती पाडून त्या ठिकाणी वसतिगृह उभारण्यात येणार आहे.
एम. पी. मिल कम्पाउंड परिसरातील संक्रमण शिबिराच्या २००० चौरस मीटर जागेवर २२ मजली वसतिगृह बांधण्यात येणार आहे. या इमारतीत २१५ खोल्यांचा समावेश असणार असून यात ६४५ नोकरदार महिलांच्या राहण्याची सोय केली जाणार आहे. या वसतिगृहाच्या बांधकामासाठी ८० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. वसतिगृहात महिलांसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. यात पार्लर-सलून, स्वयंपाकघर, एटीएम सेंटर आणि इतर दुकानांचाही समावेश असणार आहे. या सर्व सुविधा इमारतीच्या तळमजल्यावर उपलब्ध करण्यात येणार आहेत.