मुंबई (Mumbai) : म्हाडा सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेतच बदल करण्यात येणार आहेत. यापुढे इच्छुकांना अर्ज भरतानाच आवश्यक सर्व कागदपत्रे ऑनलाईन सादर करावी लागणार आहेत. कागदपत्रांच्या छाननीत पात्र ठरलेले सोडतीत समाविष्ट होतील. पात्रता निश्चित झाल्याने विजेत्यांना थेट देकार पत्र देण्यात येणार आहेत. यामुळे संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक होईल, असा दावा करण्यात येत आहे.
म्हाडाने वेळोवेळी सोडत प्रक्रियेत बदल करून ती ऑनलाईन केली आहे. मात्र, तरीही सोडतीनंतरची प्रक्रिया अनेक वर्षे संपत नसल्याचे म्हाडाच्या निदर्शनास आले आहे. एखाद्याला घराचा ताबा देण्यासाठी १५-२० वर्षे लागत आहेत. प्रतीक्षायादी अद्याप कायम आहे. यामुळे म्हाडाने अखेर सोडतीची संपूर्ण प्रक्रियाच बदण्याचा निर्णय घेतल्याची माहिती म्हाडातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यानी दिली.
आतापर्यंत सोडतीसाठी काही ठराविक कागदपत्रे लागत होती आणि सोडतीनंतर विजेत्यांकडून उत्पन्नाचा दाखला, निवासाचा दाखला, आरक्षणानुसार जात प्रमाणपत्र इतर कागदपत्रे जमा करून घेत पात्रता निश्चित केली जात होती. पण आता अर्ज भरतानाच ही सर्व कागदपत्रे जमा करावी लागणार आहेत. त्यामुळे सोडतीआधीच पात्रता पूर्ण होणार असून विजेते ठरल्यानंतर पुढे थेट देकार पत्र देऊन विजेत्यांकडून घराची रक्कम भरून घेतली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मुंबई मंडळाने म्हाडा प्राधिकरणाला सादर केला आहे. नव्या सोडत प्रक्रियेसाठी म्हाडाकडून नवीन संगणकीय प्रणाली (सॉफ्टवेअर) तयार करण्यात येत असून या प्रणालीची चाचणी आयआयटीकडून केली जाणार आहे. अर्जदारांना सोप्या पद्धतीने अर्ज भरता यावा यादृष्टीने या प्रणालीची रचना असेल.