Metro Tendernama
मुंबई

भंडाऱ्यात मेट्रो सुसाट! राज्य अन् रेल्वेची 50-50 पार्टनरशीप

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : भंडारा रोड ते भंडारा शहरापर्यंत मेट्रो रेल्वे (Bhandara Road To Bhandara City Metro Railway Project) सुरू करण्याबाबत राज्य सरकारने तत्वत: मान्यता दिली. यासंदर्भात महारेल (MahaRail) मार्फत रेल्वे (Railway) आणि राज्य सरकार (State Government) यांच्या ५०-५० टक्के आर्थिक सहभागासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) यावेळी दिल्या.

मंत्रालयात भंडारा रोड ते भंडारा शहर पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. यावेळी आमदार नरेंद्र भोंडेकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल आदी उपस्थित होते.

महारेल व्यवस्थापकीय संचालकांनी भंडारा रोड से भंडारा शहर यादरम्यान अस्तित्वातील ११ कि.मी. लांबीच्या रेल्वे मार्गिकेवर नवी ब्रॉड गेज मेट्रो लाईन प्रकल्पाचा व्यवहार्यता अभ्यास अहवाल (Feasibility Study Report) सादर केला आहे.

नागपूर मेट्रो मार्गिकेला उपमार्ग सेवेने (फिडर सर्विस) जोडण्याच्या अनुषंगाने नागपूर शहर व परिसरातील भारतीय रेल्वेच्या मार्गावर सध्या अस्तित्वात असलेल्या पॅसेंजर ट्रेन ऐवजी रेल्वे आधारित आधुनिक प्रकारच्या वातानुकुलित बी. जी. (Broad Gauge) मेट्रो ट्रेन सुरू करण्याच्या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.

हा प्रकल्प नागपूर ते भंडारा रोड या भारतीय रेल्वे मार्गिकेवर राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये ११ स्थानके असून, त्याची लांबी ६२.७ किमी आहे. भंडारा रोड ते भंडारा शहर नवी ब्रॉड गेज मेट्रो लाईन प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल महारेलने केला आहे.