Manora Tendernama
मुंबई

900 कोटींच्या मनोरा पुनर्विकासासाठी 'या' तीन कंपन्यांत स्पर्धा

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या मनोरा (Manora) आमदार निवास पुनर्विकासाला अखेर चालना मिळाली असून, पुनर्विकासाच्या पूर्व अर्हता टेंडरला (Tender) चांगला प्रतिसाद मिळाला आहे. बांधकाम क्षेत्रातील दिग्गज टाटा (Tata), एलअँडटी (L&T) आणि शापूरजी पालनजी (Shapoorji Pallonji) या तीन कंपन्यांनी मनोरा आमदार निवास पुनर्विकासासाठी उत्सुकता दर्शविली आहे. त्यानुसार लवकरच या तीन कंपन्यांपैकी एका कंपनीला कंत्राट (Contract) देऊन पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारण दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे.

नरिमन पॉइंट येथे राज्यातील आमदारांच्या निवासासाठी १९९४ मध्ये बांधण्यात आलेले मनोरा आमदार निवास २०१७ मध्ये अतिधोकादायक इमारतींच्या यादीत गेले. २०१७ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मनोरा आमदार निवासाचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले. या पाहणीतही इमारत केव्हाही धोकादायक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. त्यानंतर आमदार सतीश पाटील यांच्या खोलीतील छत कोसळल्याचे पुढे आले. सतीश पाटील हे मनोरा आमदार निवासातील खोली क्रमांक ११२ मध्ये राहत होते. अँटी चेंबरमधील पीओपीसह छत कोसळल्याची घटना होती. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

नरिमन पॉईंट परिसरात मनोरा आमदार निवासाच्या चार इमारती १९९६ साली बांधून पूर्ण झाल्या. अवघ्या २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतींचे अंतर्गत बांधकाम खराब झाले. सदनिकांमधील छताचे प्लॅस्टर कोसळत असून काही ठिकाणी भिंतींचे आवरण उखडले गेले होते. अनेक वर्षे सातत्याने बांधकामाच्या दर्जाबाबत आमदारांकडूनही तक्रारी करण्यात येत होत्या. त्यानंतर १ फेब्रुवारी २०१८ पासून आमदार निवास पुनर्बांधणीसाठी बंद करण्यात आले. मनोराचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेत २०१९ मध्ये ही वास्तू जमीनदोस्त करण्यात आली. तर २०२१ मध्ये नॅशनल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनकडून (एनबीसीसी) पुनर्विकासाचे काम काढून घेत ते सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपविण्यात आले.

त्यानुसार हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी काही महिन्यांपूर्वी पूर्व अर्हता टेंडर मागविण्यात आले. १८ ऑगस्टला टेंडर उघडण्यात आले. मात्र या टेंडरला प्रतिसाद मिळाला नाही. केवळ एकच टेंडर सादर झाले. ९०० कोटींच्या टेंडरला प्रतिसाद न मिळाल्याने पुर्नटेंडर काढण्याची वेळ सार्वजनिक बांधकाम विभागावर आली. नव्या पूर्व अर्हता टेंडर प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला. बांधकाम क्षेत्रातील दिग्गज टाटा, एल अँड टी आणि शापूरजी पालनजी या तीन कंपन्यांनी मनोरा आमदार निवास पुनर्विकासासाठी उत्सुकता दर्शविली आहे. पूर्व अर्हता टेंडरसाठी बांधकाम विभागाने काही निकष निश्चित केले होते. उदाहरणार्थ संबंधित बांधकाम कंपनीचा अनुभव, उलाढाल आदी. यामध्ये या तीन कंपन्या पात्र ठरल्या आहेत. आता येत्या काळात या तीन कंपन्यांकडून ऑफर घेऊन जी कंपनी कमी रक्कमेत चांगले सुसज्ज आमदार निवास उभा करण्याचा प्रस्ताव सादर करेल अशा कंपनीची अंतिम निवड केली जाईल. येत्या काही दिवसांत हे टेंडर अंतिम करुन कंत्राटदाराची नियुक्ती होईल आणि येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल असे सांगण्यात आले.

टाटा, एल अँड टी आणि शापूरजी पालनजी या तिन्ही कंपन्या बांधकाम क्षेत्रातील दिग्गज आणि बलाढ्य कंपन्या आहेत. त्यामुळे स्पर्धेत यापैकी कोणत्या दोन कंपन्यांचा पत्ता कट होणार आणि कोणत्या कंपनीची या टेंडरमध्ये सरशी होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

असे असणार नवे मनोरा निवास -

* १४ मजली इमारतीच्या जागेवर दोन इमारती

* एक इमारत २५ मजली तर दुसरी ४० मजली

* अंदाजे खर्च ९०० कोटी रुपये

* ६०० हून अधिक खोल्या

* १००० चौ. फूट क्षेत्रफळाच्या खोल्या

* सर्व पंचतारांकित सुविधांचा समावेश