bridge Tendernama
मुंबई

कल्याणहून ठाणे-मुंबई दरम्यानचा प्रवास सुसह्य; ३० मिनिटांची बचत

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कल्याण-डोंबिवली वरून ठाणे-मुंबई दरम्यानचा प्रवास सुसह्य करण्याच्यादृष्टीने एमएमआरडीएमार्फत बांधण्यात येणाऱ्या, १.३ किमी लांबीचा माणकोली ते मोठागाव जोडरस्ता प्रकल्प पूर्णत्वाच्या वाटेवर आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीवरून ठाणे - मुंबई दरम्यान वाहतुकीच्या वेळेत सुमारे ३० ते ३५ मिनिटांची बचत होणार आहे.

प्रकल्पाअंतर्गत जलवाहतूक आणि मासेमारी होड्या यांना गैरसोय होऊ नये यासाठी पुलाच्या खांबांमधील अंतर आणि उंची योग्य प्रमाणात राखण्यात आलेली आहे. बॅलेन्स कॅन्टिलिव्हरच्या सहाय्याने २४५ मीटर लांबीच्या स्पॅनचे बांधकाम खाडीवरच करण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासखाडीवर उभारण्यात येणाऱ्या पुलाच्या स्पॅनचे काम सध्या ७६.५८ टक्के पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील हा आव्हानात्मक भाग असल्यामुळे, हा भाग पूर्ण झाल्यावर प्रकल्पातील सर्वात महत्त्वाचा टप्पा पूर्ण होणार आहे.

तसेच प्रकल्पातील मानकोली पोहोच रस्त्याचे काम प्रगतीपथावर असून मोटागाव पोहोच रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंब्रा, शिळफाटा, कळंबोली आणि पनवेल या क्षेत्रात प्रवेश न करता मुंबईच्या दिशेने थेट प्रवास करता येईल. त्यामुळे कल्याण डोंबिवलीवरून ठाणे - मुंबई दरम्यान वाहतुकीच्या वेळेत सुमारे ३० ते ३५ मिनिटांची बचत होणार आहे. सध्यस्थितीत प्रकल्पाने ८२.०५ टक्के प्रगती केली आहे.