Mantralaya Tendernama
मुंबई

आता मंत्रालयावर असणार 'घारी'ची नजर; 41 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : विविध उपाययोजना करूनही मंत्रालयात राज्य सरकारचे लक्ष वेधू इच्छिणाऱ्या आंदोलकांना नियंत्रणात ठेवणे पोलीस यंत्रणेला कठीण होऊन बसले आहे. या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेत राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालय आणि आजुबाजूच्या परिसरावर करडी नजर ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर केला जाणार आहे. यात सीसीटीव्ही आधारित चेहऱ्यांची ओळख पटविणाऱ्या कॅमेऱ्यांचाही समावेश केला जाणार आहे. गृह विभागाने या कामासाठी ४१ कोटी ७५ लाख रुपये मंजूर केले आहेत.

मंत्रालयाच्या एकात्मिक सुरक्षा योजनेमध्ये एकात्मिक नियंत्रण केंद्र, प्रवेशपत्रिका व्यवस्थापन सॉफ्टवेअर, डेटा केंद्र, अभ्यागत व्यवस्थापन यंत्रणा-गार्डन प्रवेशद्वाराजवळ एण्ट्री प्लाझा, मादाम कामा मार्गावरील मुख्य प्रवेशद्वार, म. कर्वे मार्गावर आरसाद्वार येथे अंतर्गतही यंत्रणा असणार आहे. ड्रोन्स, पार्किंग व्यवस्थापन यंत्रणा आणि मनुष्यबळ यंत्रणाही असणार आहे. राज्याच्या गृह विभागाने वार्षिक देखभाल खर्चासह अलीकडे या योजनेला मान्यता दिली आहे.

विविध संघटनांचे प्रतिनिधी, आंदोलक, आत्महत्येचा प्रयत्न करण्याचे घडलेले प्रकार यामुळे उच्च तंत्रज्ञानयुक्त यंत्रणा उभारण्याची गरज निर्माण झाली आहे. विविध उपाययोजना करूनही, मंत्रालयात सरकारचे लक्ष वेधू इच्छिणाऱ्या आंदोलकांना नियंत्रणात ठेवणे पोलिसांना कठीण होऊन बसले आहे, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. ही योजना एकदा कार्यान्वित झाली की अभ्यागतांना सुरक्षा यंत्रणा भेदणे सहज शक्य होणार नाही. अभ्यागतांवर नियंत्रण ठेवण्याची सरकारचीही इच्छा आहे, कारण ते नियमितपणे इमारतीमध्ये येतात, त्यामुळे दैनंदिन कामकाज बाधित होते आणि त्या ठिकाणी गर्दीही जमते, असेही त्यांनी स्पष्ट केले.