Mantralaya Tendernama
मुंबई

Navi Mumbai : 'त्या' भव्य दिव्य वास्तूसाठी लवकरच टेंडर; 100 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : नवी मुंबईतील वाशी रेल्वेस्थानकासमोर भव्य दिव्य स्वरूपात बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवन वास्तूसाठी टेंडर प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येणार आहे. टेंडर प्रक्रिया पूर्ण करुन आगामी विधानसभा निवडणुकीआधी या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा नारळ फोडण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. या प्रकल्पासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचे बजेट अपेक्षित आहे.

महाराष्ट्र भवनामधील प्रथमदर्शनी भागात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा बैठा पुतळा बसविण्यात येणार आहे. महाराष्ट्र भवनाची वास्तू १२ मजल्यांची असून, यामध्ये शयनगृहाच्या ११ खोल्या, अतिथीगृह दुहेरी शेअरिंगच्या ७२, अतिथीगृह डबल बेडच्या ६८ तसेच एक्झिक्युटीव्ह १० अशा एकूण १६१ खाेल्या असणार आहेत. लोकप्रतिनिधींसोबत येणारे त्यांचे वाहनचालक किंवा कर्मचाऱ्यांकरिताही खोल्या असणार आहेत. त्याचबरोबर ई-लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, मिटिंग रूम, फूड प्लाझा, दुचाकी व चारचाकी वाहनतळ अशा अनेक विविध प्रकारच्या सर्व सुविधा या महाराष्ट्र भवनामध्ये साकारण्यात येणार आहेत.

राज्य सरकारकडून नवी मुंबईतील वाशी रेल्वेस्थानकासमोर प्रस्तावित महाराष्ट्र भवनाची नियोजित इमारत सर्व सोयी सुविधांयुक्त असणार आहे. या भवनासाठी २०१४ पासून आमदार मंदा म्हात्रेंनी पाठपुरावा केला आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये वित्तमंत्री असताना सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १०० कोटींच्या तरतुदीची घाेषणाही केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधिमंडळातील दालनात या प्रकल्पाचे नुकतेच अंतरिम सादरीकरण करण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्र भवन संकल्पित चित्रामध्ये किंचित फेरबदल करून या भव्य-दिव्य वास्तूसाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण करून तातडीने भूमिपूजन करावे, असे आदेश सिडको प्रशासनाला दिले. या वास्तुची टेंडर प्रक्रिया या आठवड्यात सुरू होणार असून लवकरच महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन होऊन बांधकामाला सुरुवात होणार आहे. बैठकीला आमदार मंदा म्हात्रे यांच्या समवेत सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक (१) शंतनू गोयल, मुख्य कार्यकारी अभियंता शीला करुणाकर, अधीक्षक अभियंता अर्जुन अनोसे, वास्तुविशारद हितेन शेट्टी, अभियंत्या तेजस्विनी पंडित यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.