Redevelopment Tendernama
मुंबई

Mumbai : फनेल झोनमधील 'त्या' इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : जुहूमधील हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्स्मीटर टॉवर गोराई येथील महापालिकेच्या जागेवर स्थलांतरित करून डीएन नगर येथील प्राधिकरणाच्या जागेवर महापालिका उद्यानाचा विकास करण्याला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे अंधेरी (पश्चिम) येथील डीएन नगर आणि गुलमोहर भागातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे.

नुकतीच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे आणि गृहनिर्माण, नगरविकास, मुंबई महापालिका आदींसह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. “बैठकीदरम्यान, भारतीय विमानतळ प्राधिकरण  (एएआय) कडून बीएमसीला डीएन नगर येथे उद्यानासाठी जमीन हस्तांतरित करण्यास तत्वतः मान्यता देण्यात आली. त्या बदल्यात, उंचीच्या निर्बंधांपासून सूट देण्यासाठी एएआयचे ट्रान्समिशन टॉवर स्थलांतरित करण्यासाठी गोराई येथील जमीन बीएमसीकडून एएआयला हस्तांतरित करण्यालाही मंजुरी दिली आहे. ह्या निर्णयामुळे अंधेरीत पश्चिम मधील डीएन नगर आणि गुलमोहर परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे, असे भाजप आमदार अमित साटम यांनी सांगितले.

साटम पुढे म्हणाले की 2019 मध्ये एएआयने ट्रान्समिशन टॉवरच्या परिघातील इमारतीच्या उंचीवर निर्बंध घातले ज्यामुळे जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. त्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. साधारण 400 जुन्या मोडकळीस आलेल्या इमारतींना दिलासा देण्यासाठी इमारतीच्या उंचीवरील निर्बंध हटवणे गरजेचे आहे. यापूर्वी, केंद्रीय मंत्रिमंडळाने मेट्रोसाठी डीएन नगर येथील भूखंड एमएमआरडीएला देण्यास एएआयला परवानगी दिली होती. एमएमआरडीएचा मेट्रो आराखडा बदलण्यात आल्याने ती जागा उद्यानासाठी बीएमसीकडे सुपूर्द करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आवश्यक आहे, असे साटम म्हणाले. 

साटम पुढे म्हणाले की गोराई येथे ट्रान्समिशन टॉवर स्थलांतरित करण्याच्या आणि इमारतींच्या पुनर्विकासासाठी मार्ग मोकळा करण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णय जलद गतीने होण्यासाठी सर्व संबंधितांची संयुक्त बैठक बोलावण्यासाठी त्यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना पत्र लिहिले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर जमिनींचे हस्तांतरण केले जाईल त्यामुळे टॉवर डीएन नगर येथून गोराई येथे हलविले जातील आणि डीएन नगर येथील मोडकळीस आलेल्या इमारतींचा मार्ग मोकळा होईल, असे साटम यांनी नमूद केले.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना लिहिलेल्या पत्रात साटम यांनी एएआय पश्चिम क्षेत्र यांनी सर्व संबंधितांच्या बैठकीच्या इतिवृत्तावर त्यांच्या निदर्शनास आणून दिले. मुंबई, चेन्नई आणि कोलकाता या मुख्य शहरांच्या बाहेर हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्स्मीटर टॉवर सिस्टीमचे स्थलांतर करण्याची शिफारस केली आहे. ज्यामुळे मुख्य शहराच्या भागात असलेल्या इमारतींवर उंचीचे निर्बंध लादले जाणार नाहीत आणि हाय फ्रिक्वेन्सी सिग्नलच्या गुणवत्तेवरही परिणाम होणार नाही. मुंबईच्या संदर्भात बीएमसीच्या आयुक्तांनी हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्स्मीटर टॉवर प्रणालींना त्यांच्या सध्याच्या ठिकाणाहून स्थलांतरित करण्यासाठी काही आवश्यकता पूर्ण करण्यासाठी आवश्यक जमिनीचे वाटप करण्यासाठी तज्ञ समितीबाबत आश्वस्त केले आहे. एएआय आणि बीएमसी यावर लक्षपूर्वक काम करतील आणि शिफारशींनुसार समस्येचे निराकरण करतील,” असे एएआय पश्चिम क्षेत्राने जारी केलेल्या बैठकीच्या इतिवृत्तात म्हटले आहे.