Siddivinayak Temple Tendernama
मुंबई

Mumbai : सिद्धीविनायक मंदिर सुशोभीकरणाला गणेश चतुर्थीचा मुहूर्त; 500 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराचा (Siddhivinayak Temple) कायापालट करण्यात येणार आहे. त्यासाठी ५०० कोटींच्या खर्चाची तरतूद करण्यात आली आहे. भक्तांसाठी पार्किंग, आसन व्यवस्था, ऊन-पावसापासून संरक्षण मिळण्यासाठी छताची व्यवस्था, पात्र ९८ पूजेचे साहित्य, फुल विक्रेत्यांसाठी सुसज्ज स्टॉल अशा सोयीसुविधा उभारण्यात येणार आहेत. त्याचबरोबर मुंबईसह देशविदेशातील भक्तांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची संख्या वाढवण्यात येणार आहे.

सिद्धिविनायक मंदिराचे सुशोभीकरण करण्यासंदर्भात मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक पार पडली. या बैठकीत मंदिराच्या सुशोभीकरणाबाबत सादरीकरण करण्यात आले. सिद्धिविनायकमंदिराचा कायापालट करत भक्तांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यानंतर मंदिराचा कायापालट करण्याबाबत सतत आढावा घेण्यात येत आहे. सह्याद्री अतिथीगृहात सुशोभीकरणाचे सादरीकरण तीन कंपन्यांनी केले. मंदिराचे सुशोभीकरण करताना डिझाईन, आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच मुंबई महापालिका टेंडर प्रक्रिया राबवणार असल्याचे सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर यांनी सांगितले.

प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सध्या असलेल्या सुविधांमध्ये वाढ करण्याची गरज आहे. त्यात सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच मंदिर परिसराचाही कायापालट करण्याचा प्रकल्प महापालिका प्रशासनाने हाती घेतला आहे. सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असल्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टीने काही वर्षांपूर्वी मंदिराभोवती संरक्षक भिंत बांधण्यात आली आहे. तरीही भक्तांची वाढती संख्या लक्षात घेता, आणखी सोयीसुविधा वाढवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. श्री सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांना उत्कृष्ट दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सुशोभीकरणाच्या कामाला गती द्यावी. या कामाचा शुभारंभ आगामी गणेश चतुर्थीच्या दिवशी व्हावा, यासाठी नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. यावेळी मुंबई शहर जिल्ह्याचे पालक मंत्री दीपक केसरकर, श्री सिद्धिविनायक न्यासाचे अध्यक्ष तथा आमदार सदा सरवणकर, माजी खासदार राहुल शेवाळे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. इक्बाल सिंह चहल, मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी आदी उपस्थित होते.