Mantralaya Tendernama
मुंबई

'सारथी'च्या 'त्या' विभागीय कार्यालयासाठी 173 कोटींची मान्यता; लवकरच टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सारथी संस्थेच्या अमरावती विभागीय कार्यालयासाठी १७३.८३ कोटींच्या अंदाजपत्रक व टेंडर प्रक्रियेस राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली. त्यामुळे मौजे नवसारी येथे सारथीचे विभागीय कार्यालय, वसतीगृह, अभ्यासिका, ऑडीटोरियम साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मौजे नवसारी स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र मागील शासकीय जागा सर्वे नंबर २९ मधील १.४४ हेक्टर व सर्व्हे नं. १३३ मधील क्षेत्र ०.८१ हेक्टर जागा अशी एकूण २.२५ हेक्टर जागेपैकी २.२४ हेक्टर जागा सारथी संस्थेच्या अमरावती विभागीय कार्यालयासाठी उपलब्ध करून देण्यात आली. सुरुवातीला ही जागा क्रीडांगणासह अन्य प्रयोजनार्थ प्रस्तावित आरक्षित असल्याने त्या जागेचे आरक्षण रद्द करून ती जागा सारथी संस्थेच्या अमरावती विभागीय मुख्यालयाकरिता उपलब्ध करून देण्यासंदर्भात शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. याबाबतच स्थानिक आमदार सुलभाताई खोडके यांनी शासनाकडे पाठपुरावा करीत अमरावतीत सारथी केंद्राची आवश्यकता असल्याची मागणी केली होती. दरम्यान, सारथी संस्थेची मागणी, विविध प्रयोजने, किमान जागेची आवश्यकता आणि जमीन महसूल संहिता मधील तरतुदी नुसार क्रीडांगणाची जागा निष्प्रभ ठरवून रद्द करण्याबाबत व ही जागा सारथी संस्थेच्या अमरावती विभागीय कार्यालयास उपलब्ध करण्यासंदर्भात ११ मार्च २०२४ रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार मौजे नवसारी येथील शासकीय जागा सारथी संस्थेच्या अमरावती विभागीय कार्यालयासाठी ३० वर्षासाठी भाडे तत्वावर उपलब्ध करून देण्यास शासनाने नुकतीच ३ जुलै २०२४ रोजी शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे.

सारथीचे अमरावती केंद्र इमारत बांधकामासाठी तयार करण्यात आलेल्या १७३.८३ कोटींच्या अंदाजपत्रकास शासनाने मंजुरी देण्यासंदर्भात आमदार खोडके यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती केली असता त्यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. ९ जुलै २०२४ रोजी शासनाच्या नियोजन विभागाने शासन निर्णय काढून नवसारी येथे सारथी संस्थेचे अमरावती विभागीय मुख्यालयाच्या १७३.८३ कोटींच्या अंदाजपत्रक व टेंडर प्रक्रियेस प्रशासकीय मान्यता दिली आहे. या अंतर्गत अमरावती मध्ये मौजे नवसारी येथे सारथी केंद्रात विभागीय कार्यालय, प्रशासकीय इमारत, वसतीगृह, अभ्यासिका, ऑडीटोरियम आदी बाबी साकारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.