मुंबई (Mumbai) : मुंबईतून जलवाहतुकीला चालना देण्यासाठी मुंबईतील रेडिओ क्लब तसेच रेवस, पालघर, वसईतील अर्नाळा किल्ला, मोरा, जंजिरा-मुरुडला जेटी बांधण्यासाठी 92 कोटी 12 लाख रुपयांचा निधी राज्य सरकारने उपलब्ध करुन दिला आहे.
गेट वे ऑफ इंडिया येथील प्रवासी जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ क्लब येथे नवीन प्रवासी जेटी बांधण्याची योजना महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाने आखली आहे. या जेटीवर किमान वीस प्रवासी बोटी उभ्या करता येतील. कारण या भागातून जलमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मेराटाइम बोर्डाच्या माहितीनुसार गेट वे ऑफ इंडियावरून दरवर्षी सरासरी 26 लाख प्रवासी प्रवास करतात. त्यात दरवर्षी दहा टक्के प्रवाशांची भर पडते. गेट वे ऑफ इंडिया येथे सध्या प्रवासी वाहतुकीसाठी दोनच धक्के आहेत. या जेटीवरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ क्लब येथे नवीन जेटी बांधण्यात येणार आहेत.
रायगड जिह्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी भाऊचा धक्का ते काशीद दिघीपर्यंतची रो-रो सेवा लवकरच सुरू होणार आहे. भाऊचा धक्का ते काशीद व पुढे दिघीपर्यंत ही जलवाहतूक सुरू होईल. सध्या गेट वे ऑफ इंडिया ते अलिबाग रो-रो सेवा सुरू झाली आहे. त्याच धर्तीवर मुंबईतून काशीद व दिघीपर्यंत ही जलवाहतूक सेवा सुरू होईल. या रो-रो सेवेतून एकावेळेस वीस मोटारी व सुमारे 260 प्रवासी प्रवास करतील अशी योजना आहे. त्यामुळे मुंबईतील प्रवाशांना मुरुड-जंजिरा, दिवेआगर, श्रीवर्धन येथे कमी वेळेत जाता येईल. या भागात बांधण्यात येणाऱ्या जेटीमुळे पर्यटकांची संख्या वाढेल. राज्यात जलवाहतुकीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने 'सागरमाला' ही योजना आखली आहे. या योजनेत केंद्राचा 50 टक्के निधी, तर राज्याचा 50 टक्के निधी असेल. या योजनेअंतर्गत राज्याच्या किनारपट्टीवर विविध ठिकाणी जेट्टी व लहान बंदरे विकसित करण्यात येणार आहेत.