Housing Society Tendernama
मुंबई

हौसिंग सोसायट्यांची बल्ले बल्ले; 'या' निधीतून ५० लाखांची विकासकामे

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : शहरी भागातील गृहनिर्माण सोसायट्यांसाठी मोठी खूशखबर आहे. आता आमदार निधीतून सोसायट्यांमध्ये विकासकामे करता येणार आहेत. एका सोसायटीत 50 लाखांपर्यंतची कामे करता येणार असून त्यामध्ये रस्ते, व्यायामशाळा, जॉगिंग ट्रॅक, पेव्हिंग ब्लॉक, सीसीटीव्ही कॅमेरे अशा विविध कामांचा समावेश आहे. नगरविकास खात्याने तसा सरकारी आदेश गुरुवारी जारी केला आहे.

यापुर्वी आमदार निधीतून, तसेच महापालिकेकडूनही सहकारी सोसायट्यांमध्ये विकासकामे करता येत नव्हती. त्यामुळे अनेक सोसायट्यांमधील नागरी समस्या सोडविण्यास मर्यादा येत होती. या निर्णयाने मात्र सोसायटीधारकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. दरम्यान, या कामांसाठी शासनाने काही अटी-शर्ती घालून दिल्या आहेत. त्यानुसार एका आमदाराला एका वर्षात अडीच कोटींची विकासकामे सोसायट्यांमध्ये करता येणार आहेत. संबंधित सहकारी गृहनिर्माण संस्थेची नोंदणी महाराष्ट्र सहकारी संस्थेअंतर्गत झालेली असणे बंधनकारक आहे. या सोसायटीला महापालिकेची मंजुरी असणे म्हणजेच भोगवटापत्र असणे आवश्यक आहे. संबंधित विकासकामाच्या 75 टक्के इतकी रक्कम आमदार निधीतून, तर उर्वरित 25 टक्के रक्कम संबंधित गृहनिर्माण सोसायटीला खर्च करावी लागणार आहे.

सोसायट्यांमध्ये करता येणारी विकासकामे -
रस्त्यांचे डांबरीकरण करणे
पेव्हिंग ब्लॉक बसविणे
परिसरात जॉगिंग ट्रॅक विकसित करणे
व्यायामशाळा अथवा छोटे मैदान करणे
परिसरात छोटे उद्यान आणि ट्री गार्ड बसविणे
सीसीटीव्ही कॅमेरे आणि अग्निशमन यंत्रणा बसविणे
इलेट्रिक्ल व्हेईकल चार्जिंग स्टेशन उभारणे
इमारतीवर सोलर यंत्रणा बसविणे
सांडपाणी प्रक्रियेसाठी प्रकल्प उभारणे
आवारात कचराप्रक्रिया प्रकल्प उभारणे
रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारणे
सौर दिवे बसविणे