मुंबई (Mumbai) : निसर्ग चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान व जिवितहानी झाल्यामुळे सरकारकडून कोकण किनारपट्टीवरील पाच जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत वीज प्रतिरोधक यंत्रणा (लायटनिंग अरेस्टर) उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील सात तालुक्यांमध्ये ४८ ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा (लायटनिंग अरेस्टर) उभारण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.
ठाणे जिल्हा चक्रीवादळ प्रभावी क्षेत्रात येत असल्याने या वादळांमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. भूमिगत विद्युतीकरण, किनारपट्टीलगत झाडांची लागवड अशा योजना राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पांतर्गत राबविण्यात येत आहेत. वीज प्रतिरोधक यंत्रणा हा देखील याचाच एक भाग आहे.
ठाणे जिल्ह्यातील विविध भागांत पावसाळ्यात वीज पडून नागरिकांसह जनावरांचा बळी जाण्याच्या घटना घडत असतात. ही हानी टाळण्यासाठी राज्य शासनाने वीज प्रतिरोधक यंत्र (लायटनिंग अरेस्टर) बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यात ४८ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्याबाबतचा प्रस्ताव सरकारकडे पाठवण्यात आला आहे. या कामासाठी २४ लाखांचा खर्च अपेक्षित असून लवकरच त्याचे टेंडर काढले जाणार आहे. वीज पडण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी वीज प्रतिरोधक यंत्रणा बसवण्यासाठी अल्प स्वरूपात खर्च येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत कार्यालये, बस स्थानक अशा ४८ ठिकाणी ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यासाठी २४ लाखांचा निधी अपेक्षित असून त्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
तालुकानिहाय ठिकाणांची संख्या -
ठाणे ४, कल्याण ५, भिवंडी ९, अंबरनाथ ७, उल्हासनगर ७, मुरबाड ३, शहापूर १०.