Coastal Road Tendernama
मुंबई

Mumbai : मरिन ड्राईव्ह ते वरळी सुसाट; कोस्टल रोडचा दुसरा टप्पा...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कोस्टल रोडची दुसरी मार्गिका आता खुली करण्यात येणार आहे. त्यामुळे मरिन ड्राईव्ह ते वरळी हे अंतर आता फक्त दहा मिनिटांत गाठता येणार आहे. आजपासून कोस्टल रोडचा दुसरा बोगदा सुरू होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दुपारी या बोगद्याला भेट देणार आहेत. ते कोस्टल रोडच्या दुसऱ्या बोगद्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर हा बोगदा सुरू होणार असल्याची माहिती आहे.

मुंबईकरांचा प्रवास जलद आणि अधिक सोईस्कर व्हावा, हा कोस्टल रोड प्रकल्पाचा उद्देश आहे. महापालिकेच्या कोस्टल रोड प्रकल्पाचा मरिन ड्राईव्हपासून सुरू होणारा हा दुसरा बोगदा आहे. तो उत्तर दिशेकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बोगद्याची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ११ जूनपासून सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत म्हणजे एकूण १६ तासांच्या कालावधीसाठी हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाहणी केल्यानंतर मरिन ड्राईव्ह परिसर ते हाजी अली हा मार्ग खुला होत आहे. हा मार्ग सुमारे ६.२५ किलोमीटरचा आहे. या मार्गामध्ये अमरसन्स उद्यान आणि हाजी अली येथील अंतरमार्गिकांचा वापर देखील करता येणार आहे. या आंतरमार्गिकांमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये होणारी वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. प्रामुख्याने बॅ. रजनी पटेल चौकामधून पुढे वरळी, वांद्रेच्या दिशेने तर वत्सलाबाई देसाई चौकामधून पुढे ताडदेव, महालक्ष्मी, पेडर रोडकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी सोय होणार आहे. दर आठवड्यात पाच दिवस हा मार्ग वाहतुकीसाठी खुला असणार आहे. सोमवार ते शुक्रवार या मार्गावर वाहतूक सुरू राहणार आहे. तर प्रकल्पाची उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवार बंद राहणार आहे. ११ मार्च २०२४ रोजी कोस्टल रोडची दक्षिण मार्गिका वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली होती. याचा मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. कोस्टल रोडची आता दुसरी मार्गिका आठवड्यातील पाच दिवसांसाठी खुली करण्यात येणार आहे.